वसई : मागील काही दिवसांपासून समुद्रात वादळी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. या वादळी वाऱ्याच्या स्थितीमुळे बहुतांश मच्छीमारांनी आपल्या अखेरच्या खेपा रद्द करून बोटी किनाऱ्यावर आणल्या आहेत. तर दुसरीकडे पावसाळ्या तोंडावर मासेमारीसाठी लागणाऱ्या साहित्याची आवरा आवर सुरू केली आहे.
वसई विरारच्या किनार पट्टीच्या भागात मोठ्या संख्येने मच्छिमार बांधव हे मासेमारीचा व्यवसाय करतात. विशेषतः अर्नाळा, पाचबंदर, नायगाव, कोळीवाडा, किल्लाबंदर अशा विविध ठिकाणच्या भागातील मच्छीमार बांधव मासेमारीचा व्यवसाय करतात. ५५० इतक्या मासेमारीसाठी जाणाऱ्या परवाना धारक बोटी आहेत. मे महिना हा मच्छिमार बांधवांच्या मासेमारीचा अखेरचा महिना मात्र याच महिन्यात वादळी वाऱ्या सारखी परिस्थिती निर्माण झाल्याने मच्छिमार बांधवांना पुन्हा एकदा माघारी परतावे लागत आहे. मासेमारी हंगामाचा यंदाचा शेवट असल्याने मोठ्या ताकदीने तयारी करून मच्छीमार बांधव खोल समुद्रात मासेमारी जातात. परंतु आता वादळीवारे सुरू झाल्याने जाता आले नसल्याचे येथील मच्छिमार बांधवांनी सांगितले आहे.
आता शेवटचे १० ते १२ दिवसच मासेमारी करण्याची संधी होती. त्यामुळे बर्फ, जाळी, डिझेल यासह आवश्यक वस्तू बोटीत भरून बोटी तयार ठेवल्या होत्या. परंतु वादळी स्थिती निर्माण झाल्याने बोटी किनाऱ्यावरच ठेवाव्या लागल्या मच्छिमार बांधव मोजेस आबा यांनी सांगितले आहे. मागील वर्षीचा हंगामात मत्स्य दुष्काळ असल्याने स्वघोषित मासेमारी बंद ठेवली होती. आता मासळी मिळते तर समुद्रात वादळी परिस्थिती आहे त्यामुळे यंदाची अखेरची आमची रिकामी गेली असल्याची प्रतिक्रिया मच्छिमार बांधवांनी दिली आहे.
पावसाळ्याच्या तोंडावर साहित्याची आवरा आवर
पावसाळ्यात या बोटींना कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये व त्यामध्ये असलेले साहित्य ही सुरक्षित राहावे यासाठी स्वच्छ धुवून बांधून ठेवल्या जातात सध्या समुद्र किनार पट्टीच्या भागात चक्री वादळ येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे त्यामुळे मच्छिमारांनी आपले सर्व साहित्य धुवून स्वच्छता नीटनेटके करून ठेवण्यास सुरवात केली आहे. आता पावसाळ्यात नारळी पौर्णिमे शिवाय या बोटी समुद्रात जाणार नाही. यासाठी वसईतील अर्नाळा, नायगाव, पाचूबंदर यासह विविध ठिकाणच्या समुद्र किनाऱ्यावर माश्यांच्या जाळ्यांची स्वच्छता , मोठं मोठे दोरखंड, व इतर साहित्य स्वच्छ करून घरच्या गोदामामध्ये नेऊन ठेवण्यास सुरवात केली असल्याची माहिती मच्छिमारांनी दिली आहे.
मत्स्य उत्पादनात घट
एकापाठोपाठ येणारी वादळे, खराब हवामान आणि त्यामुळे पाण्याच्या अंतर्गत प्रवाहांमध्ये होणारे बदल तसेच अवकाळी पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे मासेमारी करण्यास बाधा येते. पूर्ण क्षमतेने मासेमारी होत नाही. वादळी वारे आल्यास काही वेळा अर्ध्यावरूनच परत यावे लागते त्यामुळे लाखोंचे डिझेल घालवून ही काही उपयोग होत नाही. अशा विविध प्रकारच्या कारणामुळे मत्स्य उत्पादन घटत असल्याचे कोळी युवाशक्ती संघटनेचे अध्यक्ष मिल्टन सौदीया यांनी सांगितले आहे.