विशेष केंद्रात १३३ करोनाग्रस्त गर्भवतींवर उपचार, ३६ महिलांची सुखरूप प्रसूती

सुहास बिऱ्हाडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई: करोनाग्रस्त असणाऱ्या गर्भवती महिलांसाठी पालिकेने नायगावच्या जुचंद्र येथे खास केंद्र सुरू केले असून दीड महिन्यात या केंद्रात तब्बल १३३ करोनाग्रस्त गर्भवती महिला दाखल झाल्या होत्या. त्यापैकी ३६ गर्भवतींची सुखरूप प्रसूती झाली तर ११६ जणींनी करोनावर मात केली. नोंदणी करूनही खासगी डॉक्टरांनी ज्या गर्भवती महिलांना नाकारले होते, त्या सर्वावर पालिकेच्या या केंद्रात विनामूल्य प्रसूती करण्यात आली.

मार्च महिन्यात दिवसाला सरासरी ८०० रुग्ण आढळून येत होते. गर्भवतींना देखील करोनाची लागण होऊ लागली होती. ज्या रुग्णालयात त्यांनी नोंदणी केली होती तेथील डॉक्टरांनी करोनाचे कारण देत प्रसूतीसाठी नकार दिला होता. अशा गर्भवतींच्या मदतीला महापालिका धावून आली. महापालिकेने एप्रिल महिन्यात जुचंद्र येथील माता बालसंगोपन केंद्र खास करोनाग्रस्त गर्भवती महिलांसाठी राखीव ठेवले. ज्या गर्भवतींना करोनाची लागण झाली आहे, अशांना येथे दाखल करून त्याच्या प्रसूती करण्यात येत आहेत.

१४ एप्रिलपासून या केंद्रात १३३ करोनाग्रस्त गर्भवती उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. त्यातील ३६ करोनाग्रस्त गर्भवतींच्या सुखरूप प्रसूती शस्त्रक्रिया पार पडल्या. यापैकी २० महिलांची सर्वसाधारण नैसर्गिक प्रसूती झाली तर १६ महिलांची शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात आली. महिलांवर करोनाचे उपचार करण्याबरोबर त्यांची सुखरूप प्रसूाूती करणे असे कसोटीचे काम केंद्रातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना करावे लागले होते.

करोनाग्रस्त महिलांची प्रसूती करणे हे कसोटीचे काम होते. मात्र आमच्या कर्मचाऱ्यांनी मोठय़ा कौशल्याने या महिलांवर उपचार करून त्यांच्या सुखरूप प्रसूती केल्या, अशी माहिती पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ राजेंद्र चौहान यांनी दिली.

माताबाल संगोपन केंद्राचा प्रयोग यशस्वी

गरोदर महिलांना खासगी रुग्णालयात येणाऱ्या हजारो रुपयांच्या प्रसूती खर्चातून सुटका व्हावी यासाठी वसई-विरार महापालिकेने माता बाल संगोपन केंद्राची स्थापना केली होती. पालिकेचा हा प्रयोग कमालिचा यशस्वी झाला असून चार वर्षांत या केंद्रात १ लाख ६८ हजार ३९३ महिलांची तपासणी करण्यात आली आहे तर २६ हजारांहून अधिक महिलांच्या प्रसूती शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. गरोदर महिलांच्या प्रसूती शस्त्रक्रियेसाठी खाजगी डॉक्टरांकडून अवाच्या सवा पैसे उकळले जातात. सर्वसाधारण प्रसूती असेल तर ४० ते ५० हजार रुपये आणि शस्क्रक्रियेद्वारे प्रसुती झाली असेल तर हा खर्च ८० हजारांपेक्षा अधिक जातो. यामुळे सर्वसामान्य महिलांची आर्थिक पिळवणूक होते. यासाठी वसई-विरार महापालिकेने शहराती महिलांच्या प्रसूतीसाठी माताबाल संगोपन केंद्राची स्थापना केली.

२६ पैकी २२ हजार प्रसूती सर्वसाधारण

सध्या महापालिकेकडे वसई पूर्वेला सातिवली, सर्वोदय आणि नायगाव पूर्वेच्या जुचंद्र येथे एक असे मिळून तीन माताबाल संगोपन केंद्र आहेत. २०१६ साली माता बाल संगोपन केंद्रांची स्थापना करण्यात आली होती. या केंद्रात चार वर्षांत १ लाख ६८ हजार ३९३ गरोदर महिलांची  तपासणी करण्यात आली. त्यापैकी २६ हजार ९४२ महिलांची प्रसूती करण्यात आली. एका केंद्रात दिवसाला २५ प्रसूती केल्या जातात. म्हणजे तासाला सरासरी एक प्रसूती पार पाडली जाते. माताबाल संगोपन केंद्रात झालेल्या २६ हजार प्रसूतींपैकी २२ हजार प्रसूती या सर्वसाधारण होत्या तर केवळ साडेचार हजार प्रसूती या सिझेरियम्न शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आल्या.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal center support pregnant women ssh
First published on: 05-06-2021 at 00:45 IST