खासगी करोना रुग्णालयांना पालिकेचा दणका
वसई : करोना आजाराचा गैरफायदा घेत अनेक खासगी रुग्णालयांनी करोना रुग्णांना अवाजवी देयके देऊन रुग्णांची आर्थिक लूट केली होती. या रुग्णालयांना पालिकेने दणका दिला आहे. शहरातील ३३ रुग्णालयांकडून दोन कोटी १३ लाखांची रक्कम देयकांत अधिक आकारण्यात आलेल्या रुग्णालयांना ही रक्कम रुग्णांना परत करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. यात आतापर्यंत ९३ लाखांची रक्कम रुग्णांना परत करण्यात आल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेचा वसई -विरार शहराला मोठा फटका बसला. दररोज विविध ठिकाणच्या भागात मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत असल्याने काही वेळा रुग्णांना उपचारासाठी खाटा उपलब्ध होत नव्हत्या त्यातच काही खासगी रुग्णालयांनी याचा फायदा घेत करोनाग्रस्त रुग्णांना अवाजवी स्वरूपाची देयके आकारून आर्थिक लूट सुरू केली होती.
यासाठी शासनाने खासगी रुग्णालयांना उपचारासाठी दर ही निश्चिात करून दिले होते. मात्र तरीही काही रुग्णालये विविध प्रकारची कारणे पुढे करून करोना रुग्णांची लूट सुरूच ठेवली होती. या आर्थिक लुटीमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले होते. तर काहींनी कर्जकाढून या लाखोंच्या रक्कमा अदा केल्या होत्या.
करोना रुग्णांची होणारी आर्थिक लूट थांबावी यासाठी विविध स्तरातून मागणीही करण्यात येत होती. यानुसार या लुटीला लगाम घालण्यासाठी पालिकेने वैद्यकीय लेखापरीक्षण समिती स्थापन केली होती. या समितीकडून करोना रुग्णांना अवाजवी देयके आकारणाऱ्या रुग्णालयातील देयकांची तपासणी करण्यात आली. यादरम्यान पालिका हद्दीतील सुरू असलेल्या ४२ करोना रुग्णालयांपैकी तक्रारी आलेल्या ३३ रुग्णालयांनी करोना रुग्णांकडून अधिकची रक्कम आकारल्याचे समोर आले आहे. यात तक्रारी आलेल्या एकूण एक हजार ४२७ रुग्णांच्या देयकांचे लेखापरीक्षण केले आहे. यात रुग्णांकडून एकूण १५ कोटी ५५ लाख २९ हजाराची देयके आकारली असून या देयकांपैकी दोन कोटी १३ लाख इतकी रक्कम ३३ रुग्णालयांनी अधिकची आकारली असल्याचे समोर आले आहे. यात अनेक रुग्णालयांनी रुग्णांकडून शासनाच्या ठरवून दिलेल्या निश्चिात दरापेक्षा अधिक रक्कम घेतल्याचे दिसून आले. प्राणवायू, खाटा, चाचण्या यात त्यांनी अधिक शुल्क आकारणी केल्याने ही कारवाई करण्यात आली असून सर्व रक्कम रुग्णांना परत करण्यात यावी, असे आदेश पालिकेच्या लेखा परीक्षण विभागाने दिले.
आदेशानंतर ३० रुग्णांलयांनी ९३ लाखांची रक्कम परत केली आहे. यात १८ रुग्णालयांनी संपूर्ण रक्कम परत केली आहे. तर तीन रुग्णालयांनी एकही रुग्णाला रक्कम परत केली नाही. तसेच १५ रुग्णालयाकडून काही रक्कम परत करणे शिल्लक असल्याने एकूण एक कोटी १९ लाख ६४ हजार ३७४ रक्कमेचा परतावा रुग्णांना करण्याचे शिल्लक असल्याचे पालिकेच्या लेखापरीक्षण विभागाने सांगितले. ती सुद्धा रक्कम लवकरच परत करावी, अशा सूचना ही पालिकेकडून करण्यात आल्या आहेत.