वसई : नालासोपाऱ्यात वाहन चालकाला वाहतूक परवाना विचारल्याने प्रवाशाने वडिलांना बोलावून वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली. या मारहाणीची चित्रफीत समाज माध्यमावर प्रसारित झाली आहे. याप्रकरणी तीन जणांना तुळींज पोलीसांनी अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नालासोपारा पूर्वेच्या नगीनदासपाडा येथील रस्त्यावर पोलीस हवालदार हनुमंत सांगळे आणि पोलीस अंमलदार शेषनारायण आठरे दोघेही वाहतूक नियंत्रण करण्याचे काम करीत होते. याच दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकी स्वाराला थांबवून त्यांच्याकडे परवाना अन्य कागदपत्र याची विचारणा केली. या कारणावरून वाहतूक पोलीस यांच्यात वाद झाला. या वाहनचालक मुलाने आपल्या वडिलांना बोलावून वाहतूक पोलिसांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेची चित्रफीत समाजमाध्यवर प्रसारित झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पार्थ नारकर , मंगेश नारकर व आकाश पांचाळ असे मारहाण करणाऱ्यांची नावं असून त्यांना तुळींज पोलिसांनी अटक करून त्यांच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळे आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असल्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी सांगितले आहे. या तिघांना ही बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.