वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वसई फाट्याजवळ हायड्रोजन सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला अपघात झाला. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास गुजरात दिशेच्या मार्गावर ही घटना घडली. यात चालक जखमी झाला आहे, तर दुसरीकडे सिलेंडर रस्त्यावर पडल्याने आग लागली होती.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून गुजरातच्या दिशेने जी जे १२ बी वाय २२५५ या क्रमांकाचा ट्रक हायड्रोजन सिलेंडर घेऊन निघाला होता. मात्र वसई फाट्याजवळ पोहोचताच वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि थेट दुभाजकाच्या मध्ये जाऊन उलटला. यावेळी त्यात असलेले सिलेंडर हे मुख्य रस्त्यावर पडले अचानकपणे आगही लागली होती. तातडीने पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. त्यांनी अग्निबंबाच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविले. कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी मुंबई व गुजरात वहिनी वरील सर्व वाहतूक सुरक्षित अंतरावर्ती थांबवून ठेवण्यात आली होती अशी माहिती चिंचोटी केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल चिंतामण यांनी दिली आहे.

हे ही वाचा… वसई : प्राध्यापिकेला चिरडणारा तरुण मद्यधुंद असल्याचे स्पष्ट, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आग नियंत्रणात आल्यानंतर अपघातग्रस्त वाहन व रस्त्यावर पडलेले सिलेंडर क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.