वसई : वसई विरार शहरात विविध ठिकाणी ग्रामपंचायत तसेच नगरपरिषद काळातील विहिरी आढळून येतात. पण, या विहिरींच्या देखभाल दुरुस्तीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे साचलेला कचरा, दूषित पाणी यामुळे या विहिरींची दुर्दशा झाली आहे. वसई विरार शहरात अजूनही अनेक गावे आणि वस्त्यांमध्ये सार्वजनिक आणि खाजगी विहिरी आहेत. पण, गेल्या काही काळात शहरात झपाट्याने झालेले नागरीकरण, महापालिकेकडून घरोघरी देण्यात आलेली नळजोडणी यामुळे एकेकाळी पाण्याचा मुख्य स्रोत असणाऱ्या विहिरींचा वापर कमी झाला आहे.
परिणामी, शहरातील विविध ठिकाणच्या विहिरी बुजल्या आहेत. तर, नागरिकांकडून टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे या विहिरींचे अक्षरशः कचराकुंड्यांमुळे रूपांतर झाले आहे. तर काही ठिकाणी विहिरीत साचलेला पालापाचोळा, शेवाळे यामुळे विहिरीतील पाणी दूषित झाले आहे.शहरातील विविध भागात पाणीटंचाईचा प्रश्न कायम आहे. अशातच विहिरींची झालेली ही दयनीय अवस्था पाहता नागरिकांकडून त्या स्वच्छ करून देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. शहरात ज्या विहिरींची दुरवस्था झाली आहे त्यांची पाहणी करून त्या दुरूस्त केल्या जातील असे पालिकेच्या बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे.
दूषित पाण्यामुळे आरोग्यावर परिणाम
वसई विरारमधील ग्रामीण भागात अजूनही काही ठिकाणी विहिरीच्या पाण्याचा वापर दैनंदिन कामासाठी, पिण्यासाठी केला जातो. मात्र, देखभाली अभावी विहिरीमधील पाणी दूषित झाले आहे. तर या पाण्यात डासांचा, किटाणूंचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
विहिरींवर सुरक्षा जाळ्याची गरज
शहरातील बहुतांश विहिरी रहदारीच्या रस्त्यालगत किंवा वर्दळीच्या परिसरात आहेत. या विहिरींवर सुरक्षा जाळ्या (Safety Nets) नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी महापालिकेने या विहिरींची तात्काळ दुरुस्ती करावी आणि सुरक्षा जाळ्या बसवाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे
