भाईंदर : भाईंदर पूर्व येथील बाळासाहेब ठाकरे मैदानाजवळ पालिकेच्या आरक्षित जागेत उभारण्यात येत असलेल्या तात्पुरत्या स्वरूपाच्या कचरा प्रकल्पाला स्थानिक नागरिकांसह शिवसेना पक्षाने विरोध दर्शवला आहे. तर हा प्रकल्प नागरिकांच्या हिताकरिता असून शिवसेना पक्ष केवळ राजकारण करत असल्याचे आरोप सत्ताधारी पक्षाने केल्यामुळे सर्वत्र कचऱ्यामुळे वातावरण पेटले आहे. भाईंदर पुर्व येथील आरक्षण क्रमांक २१९ जागेवर तात्पुरत्या स्वरूपात कचरा प्रकल्प उभारण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या महासभेत घेण्यात आला होता. हा प्रकल्प पालिकेचे पैसे खर्च न करिता पूर्णत: मेकिंग द डिफरन्स या खासगी संस्थेला चालवण्याकरिता देण्यात आला आहे. त्यानुसार  गेल्या तीन दिवसांपासून या प्रकल्पात  केवळ कोरडय़ा कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. त्याच प्रकारे नागरिकांमध्ये कोरडा कचरा व ओला कचऱ्याविषयी जनजागृती करण्याकरिता घरोघरी जाऊन मोहीम राबवण्यात आहे.

मात्र प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे  स्थानिक नागरिकांना अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याची तक्रार शिवसेना पक्षाकडून करण्यात आली आहे. याच शिवाय आरक्षण क्रमांक २१९ ही जागा शाळेकरिता आरक्षित असताना सत्ताधारी पक्षाने आपल्याजवळील असलेल्या संस्थेला ती जागा कचरा प्रकल्प राबवण्यासाठी देण्याचा घाट घातला असल्याची तक्रार स्थानिक शिवसेना नगरसेविका सेन्हा पांडे यांनी केली आहे. तर, ‘कचरा प्रकल्प सुरू करण्यात आलेल्या परिसरात मोठय़ा प्रमाणात कचरा निघत आहे. त्यामुळे एक प्रयोग म्हणून हा प्रकल्प त्या ठिकाणी उभारण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रकल्पात केवळ सुख्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. उरला  शाळेच्या आरक्षणाचा प्रश्न तर पालिकेने अदयापही केवळ ७० टक्के जागा ताब्यात घेतली असून उर्वरित जागा ताब्यात घेणे बाकी आहे. मात्र विरोधी पक्ष नागरिकांची दिशाभूल करून यावर केवळ राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत’ असे आरोप उपमहापौर  हसमुख गेहलोत यांनी पत्रकार परिषद घेऊन केले आहेत.