वसई : मागील नऊ वर्षांपासून जिल्हा परिषदेची पालिकेच्या हद्दीत येत असलेली आरोग्य केंद्र हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अजूनही हा तिढा सुटला नसून त्या वादाचा फटका रुग्णांना बसू लागला आहे. तर दुसरीकडे हस्तांतरण वादामुळे या आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीकडे ही लक्ष दिले जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

वसईत जिल्हा परिषदेची आठ  प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत आणि ३२ उपकेंद्रे आहेत.  यातील काही आरोग्य केंद्र पालिका स्थापन झाल्यानंतर पालिकेच्या हद्दीत येत आहेत. वाढते नागरीकरण लक्षात घेता पालिकेने ३ आरोग्य केंद्र आणि १२ उपकेंद्र ही पालिकेकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया २०१५ पासून सुरू आहे.त्यानंतर शासनाच्या आरोग्य खात्याने २०२० मध्ये पत्रक जारी करून सोपारा, निर्मळ, चंदनसार ही तीन आरोग्य केंद्र व  नायगाव , सांडोर, उमेळा, पेल्हार, चंदनसार, सातीवली, वालीव , जूचंद्र, वालीव,  चिखलडोंगरी, बोळींज ही बारा हस्तांतरण करण्याबाबत सूचना केल्या होत्या.त्यानंतर पालिकेकडून हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या हस्तांतरणाच्या प्रक्रिये दरम्यान ही जागा व त्याचा मोबदला, आरोग्य कर्मचारी असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने हा प्रश्न अजूनही मार्गी लागला नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

मागील आठ ते नऊ वर्षापासून हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यांवर अजूनही अंतिम निर्णय न झाल्याने हा प्रश्न मार्गी लागला नाही.या हस्तांतरणाच्या वादामुळे मात्र या आरोग्य केंद्राच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे.यातील अनेक आरोग्य केंद्र व उपकेंद्र यांची अक्षरशः दुरवस्था होऊ लागली आहे.नालासोपारा येथील सोपारा गाव येथील आरोग्य केंद्र अनेक वर्षे जुने असून ते केंद्र ही मोडकळीस आले आहे. सुरवातीला या केंद्रातून नागरिकांना चांगली सेवा मिळत होती.

आता येथे उपचारासाठी रुग्णांना येणाऱ्या विवीध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. औषधे नाहीत, लसी नाहीत, पुरेसे मनुष्यबळ नाही, आजूबाजूचा परिसर अस्वच्छ अशा अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते कॅप्टन निलेश पेंढारी यांनी सांगितले आहे. सुरवातीला रात्री अपरात्री सुद्धा येथे डॉक्टर उपलब्ध असायचे आता तशी कोणतीच सुविधा नाही. आरोग्य केंद्र हस्तांतरण केली जात असल्याचे बोलले जात आहे. पालिका व जिल्हा परिषद यांच्या वादाचा फटका हा नागरिकांना बसत असल्याचा आरोप ही पेंढारी यांनी केला आहे. आरोग्य केंद्राच्या देखभाल दुरुस्तीच्या संदर्भात वेळोवेळी वरीष्ठ स्तरावर आम्ही अहवाल सादर करीत असतो असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ योजना जाधव यांनी सांगितले आहे.

महापालिकेची हस्तांतरणाची तयारी

जिल्हा परिषदेची ३ आरोग्य केंद्र व १२ उपकेंद्र हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. मात्र या केंद्राचा जागेचा प्रश्न सुटत नसल्याने अडचणी येत असल्याचे महापालिकेने सांगितले आहे. नुकताच दिशा समितीच्या झालेल्या बैठकीत ही हा प्रश्न उपस्थित केला होता. ज्या ठिकाणी ही आरोग्य केंद्र उभी आहेत ती जागा हस्तांतरित करून त्या बदल्यात ग्रामपंचायत हद्दीत त्यांना आरोग्य केंद्र बांधून देण्यास ही पालिका तयार असल्याचे पालिकेने सांगितले आहे. याबाबत वरिष्ठ स्तरांवर बैठक घेण्याची मागणी पालिकेने केली असून आरोग्य केंद्र ताब्यात येताच नियोजन करून नव्याने आरोग्य केंद्र उभारली जातील असे महापालिकेची अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जिल्हा परिषदेची आरोग्य केंद्र हस्तांतरण करण्याच्या संदर्भात महापालिकेची भूमिका पारदर्शी आहे. जिल्हा परिषदेने जागेच्या संदर्भातील सर्व मुद्दे सोडवून आम्हाला हस्तांतरण करावीत.संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त वसई विरार महापालिका