भाईंदर : आगामी महापालिका निवडणुका तोंडावर असल्यामुळे यंदा मिरा भाईंदरच्या गोपाळकाला उत्सवानिमित्त राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी तिजोरी उघडी केली असून लाखोंच्या दहीहंडीचे आयोजन केले आहे. मात्र दुसरीकडे, गतवर्षाच्या तुलनेत हंड्यांच्या संख्येत घट झाल्याची बाब समोर आली आहे.

दरवर्षी मिरा भाईंदर शहरात दहीकाला सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. यात शहरातील चौकाचौकात सामाजिक संस्था तसेच राजकीय नेत्यांमार्फत हंड्या उभारल्या जातात. या हंड्या फोडण्यासाठी तसेच सलामी देण्यासाठी लहान-मोठी गोविंदा पथके शहरात जागोजागी फिरताना दिसतात. येत्या काही महिन्यांतच महापालिका निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे दहीहंडीच्या निमित्ताने तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष तसेच इच्छुक उमेदवारांनी जणू पैशाची पेटीच उघडली आहे. यात हंड्यांवर लाखोंच्या बोल्या लावण्यासह सिने कलाकारांची उपस्थिती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. याबाबतची तयारीही बऱ्याच प्रमाणात पूर्ण झाली असून हंडीचा दिवस उजाडण्याची प्रतीक्षा सुरू आहे.

मात्र यावेळी सर्वत्र हंडीच्या उत्साहाचे वातावरण असले तरी गतवर्षाच्या तुलनेत हंड्यांची संख्या कमी होणार असल्याचे दिसून आले आहे. यावर्षी वाहतूक पोलिसांनी एकूण ४० मंडळांना परवानगी दिली आहे. गतवर्षी हा आकडा ४४ इतका होता, तर त्याआधीच्या वर्षी ४७ गोविंदा पथकांना परवानगी देण्यात आली होती. यावरून हंड्यांच्या संख्येत घट झाल्याचे स्पष्ट होते. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आवर्जून हजेरी लावणाऱ्या मिरा रोडच्या प्रताप फाउंडेशनची हंडी यंदा संस्थेचे मुख्य पदाधिकारी ब्रिशेन सिंग आजारी असल्यामुळे रद्द करण्यात आल्याचे अध्यक्ष विक्रम प्रताप सिंग यांनी सांगितले.

५१ लाखांची हंडी :

मिरा भाईंदर शहरात यंदा हंड्यांची संख्या कमी असली तरी बक्षिसांच्या रकमेत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यामध्ये सर्वाधिक रकमेची हंडी ‘झा फाउंडेशन’मार्फत भाईंदरच्या बाळासाहेब ठाकरे मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. यात हंडी फोडणाऱ्याला ५१ लाखांचे पारितोषिक दिले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या हंडीच्या स्थळी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना केल्या जाणार असून, शहरात वाढत असलेल्या भ्रष्टाचाराचा नाश करण्यासाठी या हंडीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शंकर झा यांनी दिली आहे.

हंडीला स्पेनच्या नागरिकांची सलामी :

भाईंदर (पूर्व) येथील नवघर मैदानात यावर्षी प्रताप सरनाईक यांच्या ‘संस्कृती प्रतिष्ठान’ तर्फे दहीहंडीचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी स्थानिक गोविंदा पथकासह स्पेन येथील ‘ग्रीनीस वर्ल्ड रेकॉर्ड’ धारक ‘वीला फ्रंका’ पथकाचे प्रतिनिधी दहा थर लावण्याचा विक्रम करणार असल्याची माहिती पूर्वेश सरनाईक यांनी दिली आहे.