वसई : प्रदूषण रोखण्यासाठी यंदा पालिकेने सुरू केलेला कृत्रिम तलावांचा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. वसईतील नागरिकांनी दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन पारंपरिक तलावांऐवजी पालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावात केले. पालिकेने उभारलेल्या अचूक व्यवस्थेमुळे कुठेही गडबड, गोंधळ झाला नाही आणि भाविकांची गैरसोय झाली नाही. कुठेही विरोध न होता शांततेच्या वातावरणात आणि भक्तीयम वातावरणात कृत्रिम तलावांमध्ये दीड दिवसाच्या हजारो गणपतींचे विसर्जन करण्यात आले.

विसर्जनकाळात तलावांचे प्रदूषण रोखण्यासाठी वसई-विरार महापालिकेने यंदा कृत्रिम तलावांचा अभिनव प्रयोग राबविला आहे. यासाठी शहरातील सर्व तलाव बंद करून ठिकठिकाणी ८३ कृत्रिम तलाव उभारले आहेत. मागील महिन्याभरापासून यासाठी जनजागृती सुरू होती. गुरुवारी दीड दिवसाच्या विसर्जनाच्या वेळी या प्रयोगाचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार पडला. शहरातील विविध भागांतील कृत्रिम तलावात भक्तीभावाने गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन झाले.

आयुक्तांकडून धन्यवाद

कृत्रिम तलावांचा प्रयोग यशस्वी केल्याबद्दल पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी वसईकर जनतेचे आभार मानले आहेत. आमच्या आवाहनाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. हे सर्वाचे सांघिक काम (टीम वर्क) होते म्हणून हे सर्व शक्य झाले, असेही पवार यांनी सांगितले.  वसईकर नागरिक सुजाण आणि सामाजिक भान असलेले आहेत, अशा शब्दांत त्यांनी वसईकरांचे कौतुक केले. कृत्रिम तलाव आणि फिरते हौद या प्रयोगाला अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कुठेही विरोध झाला नसून कसल्याही अडचणी आल्या नसल्याची माहिती विसर्जन व्यवस्थेचे समन्वयक उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी दिली.

नियोजनबद्ध विसर्जन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालिकेने तलावाच्या लगत कृत्रिम तलाव उभारले आहेत. त्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. जे भाविक गणपतीची मूर्ती घेऊन आले. त्यांच्यासाठी आरती करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आरती केल्यानंतर या मूर्ती कृत्रिम तलावात विधिवत विसर्जित करण्यात आल्या. त्यानंतर त्या पाण्यातून काढून शेजारी बांधलेल्या मंडपात ठेवण्यात आल्या. या मूर्ती संकलित करून नंतर त्या शहराच्या बाहेर असलेल्या दगडखाणींच्या तलावात नेऊन विसर्जित करण्यात आल्या. कृत्रिम तलावात विसर्जन करणाऱ्या भाविकांचा व्यासपीठावर पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येत होता. नागरिकांनी या कृत्रिम तलावाच्या संकल्पनेचे स्वागत केले. प्रदूषण रोखण्यासाठी ही एक चांगली संकल्पना असल्याची प्रतिक्रिया विसर्जनासाठी आलेल्या भाविकांनी दिली.  संध्याकाळी ६ वाजेपर्यंत एक हजारांहून अधिक गणपतींच्या मूर्तीचे विसर्जन झाले. नायगावमधील जूचंद्र गावात दरवर्षी पारंपरिक पद्धतीने तलावात विसर्जन होते. तेथील ग्रामस्थांनी मात्र कृत्रिम तलावांऐवजी याच तलावात पारंपरिक पद्धतीने विसर्जन केले.