केंद्र शासनाने वसई, विरार शहरातील सांडपाणी प्रकल्पासाठी ४९२ कोटी रुपये आणि सूर्या पाणी प्रकल्पाच्या १८५ दशलक्ष योजनेसाठी ५०९ कोटी असे मिळून १ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे रखडलेल्या नालासोपारा येथील सांडपाणी प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे.
वसई, विरार शहरात एकूण ७ सांडपाणी प्रकल्प मंजूर आहेत. त्यापैकी फक्त विरारच्या बोळींज येथे एकमेव सांडपाणी प्रकल्प सुरू आहे. त्यात दररोज २० दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. शहरातील उर्वरित सांडपाणी विनाप्रक्रिया समुद्रात सोडण्यात येत आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणावर जलप्रदूषण होत असल्याने त्याबाबत राष्ट्रीय हरित लवादाने वसई-विरार महापालिकेला प्रतिदिन साडेदहा लाख रुपयांचा दंडदेखील आकारला आहे. त्यामुळे पालिकेला त्वरित सांडपाणी प्रकल्प सुरू करण्याची आवश्यकता होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यासाठी पालिकेने नालासोपारा पूर्वेला (झोन ३) येथे ४९३ कोटींचा, तर नालासोपारा पश्चिमेला (झोन ४) २८३ कोटींची सांडपाणी प्रकल्प अर्थात भुयारी गटार योजना व मलनिस्सारण केंद्र (एसटीपी प्लॅंट) उभारण्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. प्रकल्प ३ मधून ६२ दशलक्ष लिटर्स आणि प्रकल्प ४ मधून २७ दशलक्ष लिटर असे मिळून एकूण ९० दशलक्ष लिटर्स सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा हा प्रकल्प आहे. मात्र त्यासाठी महापालिकेकडे निधी उपलब्ध नव्हता. यापूर्वी मिलेनियम सिटी योजनेअंतर्गत या प्रकल्पाला निधी मिळावा यासाठी पालिकेने केंद्राकडे प्रस्ताव सादर केला होता, परंतु त्याला मंजुरी मिळाली नव्हती. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने नुकतेच प्रसिद्ध करून या प्रश्नाला वाचा फोडली होती.या वृत्तानंतर वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनीही या प्रकल्पाला राज्य शासनाने निधी देण्याची मागणी पत्राद्वारे केली होती. पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी या प्रकल्पासाठी केंद्राकडून पुन्हा निधी मिळावा यासाठी लोकसभेत शहरातील सांडपाण्याच्या समस्येची माहिती दिली. खासदार गावित यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात दररोज ३१० दशलक्ष लिटर सांडपाणी तयार होते.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One thousand crores for sewage and water distribution amy
First published on: 22-09-2022 at 00:03 IST