वसई : श्रावण महिन्यात पर्यटनासाठी व देव दर्शनासाठी नागरिकांना विशेष बस सेवा देण्याचा निर्णय पालघर एसटी महामंडळाने घेतला आहे. श्रावणादरम्यान दर शनिवारी वसई, नालासोपारा, अर्नाळा तसेच पालघर जिल्ह्यातील विविध बसस्थानकांतून या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.यासाठी २५ जुलै पासून नोंदणी सुरू करण्यात येणार आहे.
श्रावण महिना सुरू होताच अनेक जण थंड हवेची ठिकाणं, विविध देवस्थाने अशा ठिकाणी जाण्याचे नियोजन करतात. अशा प्रवाशांसाठी खास श्रावण महिन्यापुरते एसटी महामंडळाच्या पालघर विभागाकडून विविध अष्टविनायक दर्शन, नाशिक दर्शन, मुंबई दर्शन तसेच वसई दर्शन अशा पॅकेज टूर्सचे नियोजन करण्यात आले आहे. वसई, अर्नाळा, नालासोपारा या आगारातून नियोजित टूरसाठी गाड्या सोडण्यात येणार आहेत. या सर्व टूर्ससाठी २५ जुलैपासून नोंदणी सुरू होणार असून, श्रावण महिना संपेपर्यंत ही नोंदणी करता येणार आहे. तसेच, या टूरसाठी ‘समूह नोंदणी योजना’ राबविली जाणार आहे.
श्रावण महिन्यात पालघर जिल्ह्यातील पर्यटकांना सोयीने प्रवास करता यावा, या उद्देशाने या पॅकेज टूर्सचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी समूह नोंदणी करता येईल. ठराविक पर्यटक उपलब्ध झाल्यास नागरिकांच्या मागणीनुसारही पॅकेज टूर नियोजित केले जाईल, अशी माहिती वसई आगार व्यवस्थापक प्रज्ञा उगले यांनी दिली. त्यांनी असेही स्पष्ट केले की, या टूरमध्ये प्रवासाव्यतिरिक्त इतर खर्च नागरिकांना स्वतः करणे अनिवार्य आहे असल्याचे आगार व्यवस्थापकाकडून सांगण्यात येत आहे.
उत्त्पन्न वाढीसाठी प्रयत्न
मागील काही वर्षांपासून सणासुदीच्या काळात विशेष गाड्या उपलब्ध करून देण्यावर एसटी महामंडळाने भर दिला आहे. याच पार्श्वभूमीवर श्रावण महिन्यातही विशेष सेवा देण्यावर भर दिला असून यातून उत्त्पन्न वाढीस ही मोठी मदत होईल असा विश्वास महामंडळाने व्यक्त केला आहे.
समूह नोंदणी योजना उपलब्ध:
एसटी महामंडळाच्या या पॅकेज टूरसाठी नोंदणी करताना किमान ४० पर्यटक उपस्थित असणे आवश्यक आहे. तसेच, पर्यटकांनी मागणी केल्यास आणि ४० पर्यटकांचा समूह तयार झाल्यास, महामंडळाच्या नियोजित टूर पॅकेजऐवजी इतर टूर पॅकेजही पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी प्रवाशांना जवळील आगाराशी संपर्क साधता येईल.