वसई : विरार पूर्वेच्या विजयनगर रमाबाई अपार्टमेंट इमारतींचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. याच काही भाग बाजूलाच असलेला चाळींवर पडला. मंगळवारी रात्री ११.३०च्या सुमारास ही दुर्घटना घडली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जवळपास १५ ते २० जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून अग्निशमनदल व राष्ट्रीय आपत्ती निवारण दल यांच्या मार्फत बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत नऊ जणांना बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

विरार पूर्वेच्या नारिंगी विजयनगर येथे रमाबाई अपार्टमेंट नावाची इमारत आहे. यात अनेक कुटुंब वास्तव्यास आहेत. ही इमारत अनेक वर्षे जुनी झाल्याने मंगळवारी अचानकपणे या इमारतींचा भाग कोसळला. हा भाग कोसळून थेट इमारतीला लागूनच असलेल्या चाळींवर पडल्याने मोठी दुर्घटना घडली आहे.

या घडलेल्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिकती महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी पोहचून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. याशिवाय मदत कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल ही दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे.

यात दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहे. आतापर्यंत ९ जणांना या मलब्यातून बाहेर काढून तातडीने संजीवनी, विरार ग्रामीण रुग्णालय, आणि प्रकृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर अजूनही या ढिगाऱ्याखाली १५ ते २० जण अडकून असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासन, महापालिका व स्थानिक नागरिक यांच्या मार्फत अडकलेल्यांना बाहेर काढण्यात येत आहे. ज्या भागात इमारत कोसळली आहे तेथे जाण्याचा मार्ग ही अपुरा असल्याने जेसीबी जाण्यास अडचणी येत असल्याने हातानेच मलबा बाजूला केला जात आहे.