भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसगाड्यांचे वेळापत्रक बिघडल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याची बाब समोर आली आहे. परिणामी बस थांब्यावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
मिरा भाईंदर महापालिकेची स्वतंत्र परिवहन सेवा असून ती खासगी कंत्राटदाराच्या मदतीने चालवली जाते. पालिकेच्या ताफ्यात सध्या १२८ बसगाड्या असून त्या मुंबई, ठाणे तसेच अंतर्गत मार्गांवर धावत असतात. या बसगाड्यांमधून दररोज एक लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे प्रशासनाने विविध मार्गांवर आवश्यकतेनुसार बसगाड्यांचे वेळापत्रक आखले आहे.
दरम्यान, गुरुवारी या बसगाड्यांच्या वेळापत्रकात मोठा घोळ झाल्याचे समोर आले. निश्चित वेळेपेक्षा तब्बल अर्धा तास उशिरा बसगाड्या धावत होत्या, तर काही ठिकाणी गाड्याच रद्द करण्यात आल्या. परिणामी बस थांब्यावर प्रवासी गाड्यांच्या प्रतीक्षेत उभे राहिले. मिरा रोड रेल्वे स्थानकाबाहेर बस न मिळाल्याने प्रवाशांची गर्दी उसळली व लांबच लांब रांगा लागल्या. तर डेपोतूनच कमी बसगाड्या सोडण्यात आल्याची माहिती बसचालक-मालकांनी प्रवाशांना दिली.
पावसाचा फटका
मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने ठाणे मार्गांवर धावणाऱ्या काही बसगाड्या कमी करण्यात आल्या. तसेच काही बसगाड्या नादुरुस्त होऊन गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी पाठवण्यात आल्या. त्यामुळे सकाळी बसगाड्यांच्या कमतरतेची समस्या निर्माण झाली होती. मात्र, आता आवश्यक मार्गांवर अतिरिक्त बसगाड्या सोडण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय दूर झाल्याची माहिती परिवहन विभागाचे प्रमुख दिनेश कानगुडे यांनी दिली.