पारपत्र कार्यालय पालघरमध्ये?

गेल्या अनेक वर्षांपासून वसईकरांची मागणी असलेले पारपत्र (पासपोर्ट) कार्यालय अखेर मंजूर झाले आहे.

वसई-विरारमध्ये जागा मिळेना

सुहास बिऱ्हाडे

वसई: गेल्या अनेक वर्षांपासून वसईकरांची मागणी असलेले पारपत्र (पासपोर्ट) कार्यालय अखेर मंजूर झाले आहे. मात्र या कार्यालयासाठी वसई-विरारमध्ये जागाच मिळत नसल्याने ते अद्याप सुरू झालेले नाही. वसई-विरारमध्ये जागा न मिळाल्यास पारपत्र कार्यालय पालघरला करण्यात येणार आहे. हे कार्यालय पालघरला गेल्यास वसईकरांच्या गैरसोयीत मोठी भर पडणार आहे. 

वसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक आहे. शहरातील नागरिक मोठय़ा प्रमाणात परदेशात शिक्षणासाठी, नोकरीसाठी, पर्यटनासाठी जात असतात. परदेशात जाण्यासाठी पारपत्राची (पासपोर्ट) आवश्यकता असते, पण वसई-विरार शहरात पारपत्र कार्यालय नाही. त्यामुळे पारपत्र काढण्यासाठी वसई-विरारमधील नागरिकांना मुंबई व ठाणे येथील पारपत्र कार्यालयात जावे लागते. ही कार्यालये वसईपासून दूर आहेत. या कार्यालयात जाण्यासाठी नागरिकांचा वेळ वाया जात असून त्यांचा प्रवास खर्च मोठय़ा प्रमाणावर होत आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हा त्रास कमी होण्यासाठी  शहरात स्वतंत्र पारपत्र कार्यालय सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. या मागणीनुसार केलेल्या पाठपुराव्याला यश आहे. केंद्र शासनाच्या परराष्ट्र मंत्रालयाने वसई तालुक्यात पारपत्र कार्यालय मंजूर केले आहे; पण पारपत्र कार्यालय सुरू करण्यासाठी जागाच नसल्याने अद्यापही हे पारपत्र कार्यालय सुरू झालेले नाही.

पारपत्र कार्यालयाला  जागा मिळत नसल्याने हे कार्यालय पालघर येथे नेण्याची शक्यता आहे. याबाबत पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांनी सांगितले की, पारपत्र कार्यालयासाठी आम्ही पाठपुरावा केला होता. त्यामुळे ते मंजूर झाले; परंतु आता पालिकेने किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी जागा देणे गरजेचे आहे. वसई-विरारमध्ये जर जागा मिळाली नाही तर आम्हाला हे कार्यालय पालघरमध्ये नाइलाजाने न्यावे लागेल. वसई-विरार शहरातील बहुसंख्या शासकीय जागा या ना विकास क्षेत्रात (एनडी झोन) मध्ये आहेत.

‘पालघरपेक्षा मुंबई सोयीस्कर’

पारपत्र कार्यालय जर पालघरमध्ये नेले तर वसई-विरारमधील नागरिकांसाठी ते गैरसोयीचे ठरणार आहे. पालघरपेक्षा मुंबई सोयीस्कर पडेल, अशी प्रतिक्रिया वसईतील नागरिकांनी व्यक्त केली आहे. शहरात अनधिकृत बांधकामांसाठी जागा मिळते, मात्र नागरिकांसाठी महत्त्वाचे असलेल्या पारपत्रासाठी जागा मिळू नये, हे दुर्दैवी असल्याचे मत आपचे कार्यकर्ते जॉय फरगोस यांनी सांगितले. डोंबिवलीमध्ये टपाल कार्यालयात पारपत्र कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्या धर्तीवर वसईतील टपाल कार्यालयात पारपत्र कार्यालय सुरू करता येईल, असे त्यांनी सांगितले.

पारपत्रासाठी जागा आवश्यक आहे. वसई-विरारमध्ये यासाठी कुठली जागा देता येईल त्याबाबत वसईचे प्रांत अधिकारी सांगू शकतील.

– डॉ. माणिकराव गुरसळ, जिल्हाधिकारी, पालघर

पारपत्र हा केंद्राचा विषय आहे. वसई-विरार शहरात खूप शासकीय भूखंड आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय पारपत्र कार्यालयाला जागा देण्याचा निर्णय घेऊ शकतील. कारण हा निर्णय पालिकेच्या अखत्यारीत नाही

– गंगाथरन डी., आयुक्त, वसई विरार महापालिका

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वसईकरांना स्वतंत्र पारपत्र कार्यालय मंजूर झाले आहे. मात्र जागा देण्याबाबत उदासीनता दिसत आहे. मी जागेसाठीदेखील पाठपुरावा करणार आहे. मात्र वसईत जागा मिळाली नाही तर नाइलाजाने हे कार्यालय पालघरला न्यावे लागेल.

-राजेंद्र गावित, खासदार, पालघर

वसई विरार शहरातील बहुसंख्य जागा या ना विकास क्षेत्रात आहेत; परंतु पारपत्रासाठी कमी जागा असल्याने त्याबाबत संबंधित कार्यालयाशी बोलून जागा उपलब्ध करून देता येईल.

– स्वप्निल तांगडे, प्रांत अधिकारी, वसई

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व वसई विरार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Passport office palghar ysh

Next Story
औद्योगिक वसाहतीत घाणीचे साम्राज्य
ताज्या बातम्या