वसई: सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना लागणाऱ्या परवानग्या ऑनलाइन पोर्टल द्वारे देण्यास पालिकेने सुरवात केली आहे.आतापर्यंत पालिकेकडे ४५५ सार्वजनिक मंडळांनी अर्ज दाखल केले आहेत.वसई विरार मध्ये विविध ठिकाणच्या भागात मंडळांकडून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र तो साजरा करताना नागरी सुरक्षेच्या दृष्टीने विविध प्रकारच्या परवानग्या लागतात. याआधी लागणाऱ्या परवानग्या मिळविण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांना हेलपाटे मारावे लागत  होते. आता राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने  सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळाव्या यासाठी पालिकेकडून एक खिडकी हा उपक्रम सुरू केला आहे. ऑनलाइन स्वरूपात पोर्टलवर अर्ज मागविण्यात येत आहेत.

आतापर्यंत पालिकेच्या ऑनलाइन पोर्टल वर ४५५ सार्वजनिक मंडळांनी परवानगी साठी अर्ज सादर केले आहेत.पोलीस विभाग, वाहतुक नियंत्रण शाखा, महाyराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी व अग्निशमन विभाग यांच्याकडे ना हरकत प्रमाणपत्र यासाठी वर्ग करण्यात येत आहेत. पालिकेने आतापर्यंत पडताळणी करून ३८० मंजूर करून पुढील मंजुरी साठी पाठविले आहेत. यात वाहतूक विभाग स्तरावर ३५७, महावितरण २१८, पोलीस २६४, अग्निशमन २४९ मंडळांना ना हरकत प्रमाणपत्र देऊन पुढील प्रक्रियेसाठी पाठविण्यात आले आहेत

सर्व विभागाच्या परवानग्या मिळाल्यानंतर ऑनलाइन स्वरूपात पालिकेकडून मंडळांना परवानगी दिली जात असल्याचे माहिती तंत्रज्ञान विभागाकडून सांगण्यात आले आहे. आतापर्यंत तशा ३० मंडळाना परवानग्या दिल्या आहेत  जे अर्ज प्रलंबित आहेत त्यांची पडताळणी करून त्यांना ना हरकत प्रमाणपत्र उपलब्ध होतील असे पालिकेने सांगितले आहे. मागील वर्षी ५९० गणेश मंडळांना ऑनलाइन परवानग्या देण्यात आल्या होत्या.