एकाच दिवसात ५० हजारांहून अधिक जणांना लसमात्रा देण्याचा विक्रम
वसई : वसई-विरार महापालिकेने बुधवारी एकाच दिवसात ५० हजारांहून अधिक लशींचे वितरण यशस्वीरीत्या पार पाडले. पालिकेच्या ७९ केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली होती. यंदा पालिकेने नियोजन केल्याने सर्वच केंद्रावर लसीकरण सुरळीत पार पडल्याने नागरिकांची गैरसोय झाली नाही.
पालघर जिल्ह्याला बुधवारी राज्य शासनाकडून २ लाख लशींचा साठा मिळाला होता. त्यापैकी वसई विरार महापालिका क्षेत्रासाठी एक लाख कोव्हिशिल्ड लशी देण्यात आल्या होत्या. प्रथमच इतक्या मोठय़ा प्रमाणावर लशींचे वितरण करण्यात येणार असल्याने पालिकेने नियोजन केले होते. त्यानुसार एकूण ७९ केंद्रावर ५३ हजार लशी वितरीत करण्यात आल्या होत्या. सर्वाधिक लशी या वरुण इंडस्ट्री येथील केंद्रावर देण्यात आल्या होत्या. ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी येणारी अडचण लक्षात घेऊन पालिकेने अनेक केंद्रावर थेट लशीकरण (१०० टक्के ऑफलाईन) ची सोय करण्यात आली होती. बुधवारी मोठय़ा प्रमाणावर लशी मिळणार असल्याने सर्वच केंद्रावर सकाळपासून मोठी गर्दी होती. मात्र कुठल्याही केंद्रावर गोंधळ बघायला मिळाला नाही. बुधवारी आयुक्त गंगाथरन डी आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी यांनी बैठका घेऊन लसीकरणाचे नियोजन केले होते. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. एका दिवसात १ लाख लशींचे वितरण करणे शक्य नसल्याने एका दिवसात ५० हजारांहून अधिक लशींचे वितरण करण्यात आले होते. लोकांच्या रांगा असल्या तरी सर्वाना लस देण्यात येत होती. वरुण इंडस्ट्री लसीकरम्ण केंद्रात ५ हजार लशी होत्या. लस देण्यासाठी ५० टेबलवर आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना सहज लस मिळत होत्या. आम्ही कुपन न देता जे येतील त्यांना लशी दिल्या. रांगेचे नियोजन केल्याने कुठेही गोंधळ आणि गडबड झाली नाही अशी माहिती केंद्राचे प्रमुख डॉ विनय सोलापुरे यांनी दिली. दिवाणमान केंद्रातही ऑनलाइन आणि ऑफलाइन अशी वेगळी व्यवस्था करम्ण्यात आली होती. या केंद्रावर देखील सकाळपासूनच गर्दी होती. नोंदणी करून लशी देण्याचा वेग वाढवल्याने दुपारनंतर गर्दी ओसरली. मात्र केंद्रावरील कर्मचाऱ्याने गर्दीचे नियोजन केल्याने लसीकरण प्रक्रिया शांततेत पार पडली.
नालासोपारा पूर्वेच्या केएमपीडी केंद्रात स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन लसीकरण नियोजनबद्धरीत्या करण्यात आले होते. यामुळे बुधवारचे लसीकरण व्यवस्थित पार पडले अशी माहिती केंद्राचे प्रमुख डॉ पंडित राठोड यांनी दिली.
नालासोपारा पश्चिमेला पालिकेने नव्याने रुग्णालय तयार केले आहे. या रुग्णालयात तीन हजार लशींचे वितरण करण्यात आले. जे नागरिक ऑफलाइन आले आहेत त्यांना लशी देण्यात आल्या. लशी संपल्यानंतर आम्ही अतिरिक्त लशी मागवून त्या दिल्या, त्यामुळे कुणाची गैरसोय झाली नसल्याचे रुग्णालयाचे प्रमुख डॉ. विक्रम राठोड यांनी सांगितले.
सर्वाना लशी मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. बुधवारी लशींचा साठा मुबलक होता. आम्ही केंद्रे वाढवली आणि वितरणासाठी कर्मचायाऱ्यांची नियुक्ती केली. त्यामुळे कुठल्याही नागरिकांना लशीशिवाय परतावे लागले नाही.
डॉ. भक्ती चौधरी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, वसई-विरार महापालिका.