वसई पोलिसांनी २७ वर्षीय महिलेला दीड कोटींचे दागिने चोरल्या प्रकरणी अटक केली आहे. ज्योती भानुशाली असं या महिलेचं नाव आहे. ही मूळची गुजरातच्या नवसारी येथील आहे. ज्योतीने पुरुषाप्रमाणे वेशांतर करुन बहिणीच्या घरी डल्ला मारला आणि दीड कोटींचे दागिने चोरले. पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. तिच्याकडून दीड कोटींचे दागिने ताब्यात घेतले आहेत.

नेमकी घटना काय?

११ ऑगस्ट रोजी दुपारी दीडच्या सुमारास वसई पश्चिमेच्या शास्त्री नगर परिसरात राहणाऱ्या ओधवजी भानुशाली (६६) हे घरात एकटे होते. याच दरम्यान घर भाड्याने हवं असल्याचा बहाणा करून एक अज्ञात इसम घरात शिरला होता.यानंतर त्याने बाथरूमला जायचा बहाणा केला. तिथे गेल्यानंतर तुमच्या बाथरूमला गळती लागली असल्याचे सांगितल्याने वृद्ध ही त्याठिकाणी गेला व त्या वृद्धाला स्वच्छतागृहात डांबून ठेवले. त्यानंतर चोरट्याने घरातील दीड कोटी रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले होते. हा तरुण म्हणजे दुसरं तिसरं कुणीही नसून पुरुषाच्या वेशातील ज्योती भानुशाली होती.

या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तात्काळ या घटनेचा तपास सुरू केला होता. मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज व माहितीच्या आधारे मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या बारा तासातच आरोपी महिलेला गुजरात नवसारी येथून अटक करून तिच्या कडून चोरीस गेलेला दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पुरुषाचे रूप धारण करून चोरी

ज्योती भानुशाली ही ओधवजी भानुशाली यांच्या मोठ्या सुनेची बहीण आहे. ज्योती हिला शेअर मार्केट मध्ये लाखो रुपयांचा तोटा झाला होता. याशिवाय शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी विविध ठिकाणाहून कर्ज ही घेतले होते. ते कर्ज चुकते करण्यासाठी तिने आपल्या बहिणीच्या घरी चोरी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. कारवाई मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, दत्तात्रय सरक, सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष मदने, संतोष चव्हाण, मनोहर तावरे, आसिफ मुल्ला, पोलीस हवालदार प्रविणराज पवार, समीर यादव, शिवाजी पाटील, धनजंय चौधरी, गोविंद केंद्रे, रविंद्र भालेराव, विकास राजपूत, रविंद्र कांबळे, हनुमंत सुर्यवंशी, विजय गायकवाड आदिंच्या पथकाने केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास माणिकपूर पोलीस करत आहेत.