बोगस डॉक्टर हेमंत पाटीलकडून वसईतील अनेक रुग्णालयांत शस्त्रक्रिया
वसई : बोगस डॉक्टर हेमंत पाटील याने वसई-विरार शहरातील अनेक नामांकित रुग्णालयांत रुग्णांच्या शस्त्रक्रिया केल्याचे उघड झाले आहे. पोलीस त्या सर्व रुग्णालयांकडे चौकशी करत असून त्या रुग्णालयांच्या डॉक्टरांना साक्षीदार करणार आहेत. हेमंत पाटील ऊर्फ हेमंत सोनावणे हा तोतया डॉक्टर २०१८ पासून वसई-विरार शहरात अस्थिरोगतज्ज्ञ म्हणून वावरत होता. वसईच्या पारनाका येथे त्याने दवाखानादेखील उघडला होता. दरम्यान, तो शहरातील नामांकित रुग्णालयांत जाऊन रुग्णांवर शस्त्रक्रियादेखील करत होता. त्याने केलेल्या सर्व शस्त्रक्रिया अपयशी ठरल्या होत्या. त्याने केलेल्या शस्त्रक्रियांमुळे अनेक जणांना अपंगत्व आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे त्याच्यावर हत्येच्या प्रयत्न केल्याप्रकरणी कलम ३०७ अन्वये वसई पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. त्याने वसईपासून थेट बोईसपर्यंतच्या रुग्णालयात जाऊन शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यामुळे ही सर्व खासगी रुग्णालये पोलिसांच्या रडारवर आली आहेत. या सर्व रुग्णालयांची पोलीस चौकशी करणार आहेत
हेमंत पाटील याला रुग्णालयाने पॅनलवर कुठल्या आधारे नियुक्ती केली? त्याला कुणाच्या संदर्भाने शस्त्रक्रियेसाठी बोलावले? याची माहिती या रुग्णालयांकडून घेतली जाणार आहे. ज्या रुग्णालयात त्याने शस्त्रक्रिया केल्या त्या रुग्णालयांना हेमंत पाटील याने खोटी माहिती देऊन त्यांचीदेखील दिशाभूल केली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या रुग्णालयांच्या डॉक्टरांना हेमंत पाटीलच्या गुन्ह्यात साक्षीदार केले जाणार आहे, अशी माहिती वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी दिली. हेमंत पाटील याने वसई-विरार शहरातील १५हून अधिक रुग्णालयांत रुग्ण घेऊन जात होता. त्या सर्वाचे रजिस्टर आम्ही तपासत आहोत तसेच त्या सर्व डॉक्टरांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू केले आहे, अशी माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.
आणखी एका महिलेची तक्रार
हेमंत पाटील हा अनेक महिलांना डॉक्टर असल्याचे भासवून प्रेमाच्या जाळय़ात ओढत असे. उच्चशिक्षित महिलांशी लग्न करून त्यांची आर्थिक फसवणूकदेखील करत असे. आतापर्यंत त्याने पाच महिलांशी लग्न केल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरोधात ठाण्यात राहणाऱ्या एका महिलेने येऊन तक्रार दिली आहे. ही महिला राज्य शासनाच्या सेवेत नोकरीला आहे. हेमंत पाटील तिच्याशी लग्न करणार होता. दरम्यान, अमरावतीमध्ये हेमंत पाटीलवर गुन्हा दाखल असल्याची माहिती या महिलेला मिळाली आणि ती वेळीच सावध झाली. हेमंत पाटीलने आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार तिने वसई पोलीस ठाण्यात दिली आहे.