४५० अधिकारी आणि दीड हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात
विरार : शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या गणपती उत्सवासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला आहे. यात ४५० अधिकारी आणि १७५० पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय गृहरक्षक दल, दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान शहरात ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.
करोना वैश्विक महामारीमुळे मागील दोन वर्षांपासून गणपती सणावर निर्बंध लावण्यात आले होते. पण या वर्षी करोना प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाकडून यावर्षी निर्बंध शिथिल केले आहेत.
वसई विरार परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त प्रशांत वाघुंडे यांनी माहिती दिली की, विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ पोलीस निरीक्षक, १७ साहायक पोलीस निरीक्षक, ९४ पोलीस कर्मचारी १ दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५ साहाय्यक पोलीस निरीक्षक, ३४ पोलीस कर्मचारी, ७ महाराष्ट्र पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तर अर्नाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ पोलीस निरीक्षक, ०५ साहाय्यक पोलीस निरीक्षक, ३९ पोलीस कर्मचारी, ४ महाराष्ट्र पोलीस कर्मचारी बंदोबस्त दिला आहे.
वसई-विरार परिमंडळ ३ च्या हद्दीतील ४ पोलीस ठाण्या मिळून ५४ अधिकारी आणि २४० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यातील वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीत ०२ पोलीस निरीक्षक, १० सहायक पोलीस निरीक्षक, ३१ पोलीस कर्मचारी, ०६ महाराष्ट्र पोलीस कर्मचारी, ४५ होमगार्ड तर नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५ साहाय्यक पोलीस निरीक्षक, ३४ पोलीस कर्मचारी, ०७ महाराष्ट्र पोलीस कर्मचारी तर माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ अधिकारी आणि ४९ पोलीस कर्मचारी, आणि ३० गृहरक्षक यांचा बंदोबस्त आहे, तर तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ अधिकारी ८१ कर्मचारी आणि ४० गृहरक्षक तर वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ अधिकारी ७३ कर्मचारी आणि ३५ गृहरक्षक यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यासाठी वाहतूक शाखेकडून २ अधिकारी आणि ३४ कर्मचारी आणि २२ सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान पालघर जिल्ह्य़ात दहा हजारांपेक्षा अधिक श्रीगणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
बंदोबस्ताचा आराखडा
यंदा गणेशोत्सव मंडळांची संख्या वाढली आहे. पण सण शांततेत पार पडावा यासाठी पोलीस दलाने विसर्जन तलाव, मोक्याचे नाके, वाहतूक कोंडी होणारे परिसर अशा वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस तैनात केले आहेत. गणेशोत्सवाच्या महिनाभर आधीपासून पोलिसांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. या काळात दहा दिवस शहरात बंदोबस्त ठेवण्यासाठी पोलिसांनी आराखडा तयार केला आहे.