|| सुहास बिऱ्हाडे

पदांची भरती होईपर्यंत गृहरक्षक आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाची मदत घेणार

वसई : मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात मागील ८ महिन्यांत ३८५ रिक्त पदे भरण्यात यश आले आहे. तरी अद्याप १२८५ पोलीस कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. कर्मचाऱ्यांच्या भरतीला परवानगी देण्याची मागणी आयुक्तांनी राज्य शासनाकडे केली आहे. जोपर्यंत ही रिक्त पदे भरली जात नाहीत तोपर्यंत गृहरक्षक दल आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाची मदत घेतली जाणार आहे.

पालघर जिल्हा आणि ठाणे ग्रामीण पोलिसांचे विभाजन करून १ ऑक्टोबर २०२० रोजी ‘मीरा-भाईंदर, वसई- विरार’ पोलीस आयुक्तालयाची स्थापना करण्यात होती. त्या वेळी वसई-विरार  शहरात सात  तर मिरा भाईंदर शहरात सहा पोलीस ठाणी अस्तित्वात होती. नव्या रचनेनुसार आयुक्तालयात तीन परिमंडळांची रचना करण्यात आली आणि सात नवीन पोलीस ठाणी प्रस्तावित करण्यात आली. त्यामध्ये वसई- विरार शहरात  पाच आणि मिरा भाईंदर शहरातील दोन पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाली तेव्हा तीन हजार ३३१ पदांना मंजुरी देण्यात आली होती. त्यात ४२६ अधिकारी आणि दोन हजार ९०५ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. परंतु  २७२ पोलीस अधिकारी आणि  एक हजार ३९८ असे मिळून एक हजार ६७० पोलिसांच्या जागा रिक्त होत्या.

पोलीस कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी प्रयत्न

पोलीस कर्मचाऱ्यांच्या विविध पदांची भरती २०१९ साली झाली. त्या वेळी पोलीस आयुक्तालय अस्तित्वात नव्हते. अद्याप २०२० ची पोलीस कर्मचारी भरती प्रलंबित आहे. त्यामुळे आमच्याकडी पदे भरण्यासाठी परवानगी द्या अशी मागणी आम्ही शासनाकडे केली आहे, असे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी सांगितले. पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी आंतरजिल्हा बदलीवर कुणी यायला इच्छुक आहे का? त्याची विचारणा केली. त्यातील १२० पोलीस कर्मचारी तयार झाले आहे. १०५ जणांचे आदेश काढले असून काही दिवसांत हे १०५ पोलीस कर्मचारी रुजू होतील, असेही आयुक्त दाते यांनी सांगितले. पोलीस कर्मचाऱ्यांची पदे भरेपर्यंत गृहरक्षक दल तैनात करण्याचा विचार आहे. त्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाकडे विचारणा केली आहे. याशिवाय महाराष्ट्र सैनिक बलाचीदेखील मदत घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांची पदे भरण्यात यश

पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाली तेव्हा ४२६ अधिकाऱ्यांची पदे मंजूर होती. मात्र प्रत्यक्षात केवळ १५४ अधिकारी हजर होते आणि २७२ पदे रिक्त होती.आयुक्त सदानंद दाते यांनी नव्या आयुक्तालयाची घडी बसविण्यासाठी अधिकाऱ्यांची गरज लक्षात घेऊन अधिकाऱ्यांची पदे भरण्यावर जोर दिला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. १ जुलैपर्यंत ३४१ रिक्त अधिकाऱ्यांची पदे भरण्यात आली. आता केवळ ८५ पदे रिक्त आहेत. १९ पोलीस निरीक्षकांची संख्या वाढवून ५० एवढी झाली. एक पोलीस उपायुक्तांवरून  पाच उपायुक्त वाढविण्यात आले. ४५ साहाय्यक पोलीस निरीक्षक  आणि ८२ पोलीस उपनिरीक्षक  वाढविण्यात आले. अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नियुक्ती झाल्याने शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना यश आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस आयुक्तालयातील रिक्त पदे काही प्रमाणात भरण्यात आली आहेत. आयुक्तालयाची स्थापना झाली तेव्हा एक हजार ६६१ मनुष्यबळ होते. त्यात वाढ होऊन दोन हजार ४४ एवढे झाले आहे.  आंतरजिल्हा बदलीच्या माध्यमातूनदेखील पोलीस अंमलदारांची रिक्त पदे भरण्याचे प्रयत्न सुरू  आहेत. जोपर्यंत भरती होत नाही तोपर्यंत वाढीव गृहरक्षकांची (होम गार्डस)  आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाची (स्टेट सिक्युरिटी फोर्स) मदत घेतली जाणार असून तसा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. – सदानंद दाते, पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय