वसई – सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला निवडणूका घेण्याचे निर्देश दिल्यानंतर तब्बल ५ वर्षानंतर वसई विरार महापालिकेच्या रखडलेल्या निवडणूका होणार आहेत. या निवडणुकांचे संकेत मिळताच निवडणुकीच्या तयारीसाठी राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली असून कार्यकर्त्यांना सक्रीय करण्यात येत आहे.
निवडणूका घ्याव्यात यासाठी आम्ही न्यायायात पाठपुरावा करत होतो. सर्वप्रथम आमचीच मागणी होती असे बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी सांगितले. आम्ही वर्षभर काम करत असतो. आमचे कार्यकर्ते सदैव सक्रीय असतात. लोकांचा आजही बहुजन विकास आघाडी आणि लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्यावर विश्वास असल्याने आम्हाला चिंता नाही असे ते म्हणाले. ५ वर्षांनी निवडणूक होणार आहे. या विलंबामुळे नगरसेवकांची एक कार्यकाळ वाया गेला आहे.
आता सर्वोच्च न्यायालयानेच निर्देश दिल्यामुळे निवडणुका होणार आहेत. आमच्याकडे केवळ उच्छुक नाही तर संभाव्य नगरसेवक बनतील असे तगडे उमेदवार असल्याचा दावा शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाच्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या निर्देशा मुळे वसई तालुक्यातील २९ गावात ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका होतील, असे कॉंग्रेसचे नेते अँड. जिमी गोन्सालवीस यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने खरंतर या आधीच हा निर्णय द्यायला हवा होता. निवडणूक न झाल्याने प्रशासनाचा मनमानीपणा वाढला होता. निवडणुकीबद्दल आमची भूमिका लवकरच जाहीर करू असे स्वराज अभियानचे प्रमुख धनंजय गावडे यांनी सांगितले. निवडणूका होणार असल्याचे स्पष्ट होताच नेते ही कामाला लागले आहेत. प्रत्येक प्रभागात व विभागात आपले कार्यकर्ते ही सक्रिय केले जात आहे. तर दुसरीकडे निवडणुक लढविण्यास इच्छुक उमेदवारांनी ही मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. विविध छोट्या छोट्या कार्यक्रमातून जनतेच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करीत आहेत.
कॉंग्रेसची बविआला साद
काँग्रेस विचारधारा आता खऱ्या अर्थाने मतदारांना समजली आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये पालघर जिल्ह्यासह वसई विरार महापालिका निवडणूक सर्वत्र आमच्या पक्षासाठी आशादायी चित्र आहे. बहुजन विकास आघाडीला सोबत घेण्यासाठी महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते व आम्ही प्रयत्नशील असून सर्व निर्णय वरिष्ठ पातळीवरून होईल, असे युवक कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी सांगितले.
भाजपाच्या आशा पल्लवित
विधानसभा लोकसभा निवडणुकीत भाजपने वसई विरार शहरात वर्चस्व मिळविले आहे. त्यामुळे आगामी काळात महापालिका निवडणुकीत आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सध्या भाजपची संघटनात्मक बांधणी सुरू आहे. आगामी महापालिका निवडणुका मध्ये वसई विरार शहरात भाजप पूर्ण ताकदीने मैदानात उतरून यश मिळविणार असा विश्वास भाजपाचे वसई विधानसभा प्रमुख मनोज पाटील यांनी व्यक्त केला आहे.
२०१४ ची निवडणूक स्थिती
यापूर्वी २०१४ साली निवडणूक पार पडली त्यात ११५ जागा पैकी १०५ नगरसेवक बविआचे निवडून आणून एका हाती सत्ता मिळविली होती. तर शिवसेनेचे ५ ,अपक्ष ४ व १ भाजपने जागा मिळविली होती. करोना काळ सुरू झाल्यानंतर पुन्हा निवडणुका झाल्या नाहीत त्यामुळे आजपर्यंत पालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे.