वसई : जुलै महिन्यात वसई ग्रामीणमधील ११ ग्रामपंचयतींची मुदत संपुष्टात येत आहे. परंतु करोनाच्या संकटामुळे निवडणुका घेणे शक्य नसल्याने या ग्रामपंचायतींवर शासनाकडून प्रशासक नेमण्यात येणार आहे. यामुळे या ग्रामपंचायतीचा कारभार हा प्रशासकाच्या हाती जाणार आहे.
करोनाच्या संकटामुळे वसई-विरार महापालिकेची निवडणूक अनिश्चिात काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता वसई ग्रामीणमधील ११ ग्रामपंचायतीची मुदत ही या जुलै महिन्यात संपुष्टात येत आहे. यात वसईतील खानिवडे, शिरवली, मेढे, पोमण, शिवणसई, आडणे, उसगाव, सकवार, भाताणे, माजिवली आणि चंद्रपाडा यांचा समावेश आहे. यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदी लोकप्रतिनिधींचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. त्या ठिकाणी प्रशासक म्हणून नेमण्यासाठी विस्तार अधिकारी या दर्जाचे पद असलेल्या अधिकाऱ्यांची नावांची यादी ही जिल्हा स्तरावर पाठविण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतमध्ये विकासकामांसाठी जे अधिकार सरपंच, उपसरपंच यांना जे अधिकार आहेत ते अधिकार आता नेमलेल्या प्रशासकाच्या हातात जाणार आहेत.
यामुळे यापुढे ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंच यांना ग्रामपंचायतीच्या कामात हस्तक्षेप करता येणार नसल्याने जी काही त्यांची कामे बाकी आहेत ते अवघ्या काही दिवसांतच मार्गी लावावी लागणार आहे.
मुदतीचा अल्पावधी
खानिवडे व शिरवली ग्रामपंचायतींची मुदत १६ जुलै रोजी संपत आहे. मेढे, पोमण, शिवणसई, आडणे, उसगाव, सकवार या ग्रामपंचायतींची मुदत १७ जुलै रोजी संपत आहे. तसेच भाताणे व माजिवली ग्रामपंचायतींची मुदत १८ जुलै रोजी संपत आहे. तर चंद्रपाडा ग्रामपंचायतीची मुदत २४ जुलै रोजी संपत आहे.
वसईतील ११ ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. यासाठी जिल्हा स्तरावरून प्रशासकांची यादी मागविण्यात आली होती. त्यानुसार यादी तयार करून पाठविली आहे. आता जिल्हा स्तरावरून जो काही निर्णय होईल त्यावर पुढील प्रक्रिया अवलंबून आहे. – भरत जगताप, गटविकास अधिकारी पंचायत समिती, वसई