scorecardresearch

ख्रिस्ती समाजावरील हल्ल्यांचा निषेध

ख्रिस्ती धर्माविरोधात असलेले द्वेषाचे वातावरण आणि वाढत्या हल्ल्यांचा वसईत बिशप हाऊसतर्फे मूक निषेध करण्यात आला.

वसईत बिशप हाऊसतर्फे ६ ठिकाणी शांततामय मार्गाने निदर्शने

वसई : ख्रिस्ती धर्माविरोधात असलेले द्वेषाचे वातावरण आणि वाढत्या हल्ल्यांचा वसईत बिशप हाऊसतर्फे मूक निषेध करण्यात आला. वसई धर्मप्रांतातील ६ ठिकाणी या मूक निषेध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य, शिक्षण, समाजसेवा, सहकार इत्यादी क्षेत्रांत काम करणाऱ्या ख्रिस्ती समाजाला गेल्या काही महिन्यांपासून लक्ष्य करण्यात येत असून ख्रिस्ती चर्चवर हल्ले होत आहेत. त्याचा मूक निषेध करण्याचे आवाहन ‘ऑल इंडिया कॅथलिक युनियन’ या संस्थेने केले होते. ३० जानेवारी या महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय हुतात्मा दिनाचे औचित्य साधून वसई धर्मप्रांतातील ६ ठिकाणी ही मूक निदर्शने करण्यात आली. देशभरातील ख्रिस्ती समाजाला देशाच्या एकतेसाठी उपवास व प्रार्थनेद्वारे एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार करोना नियमांचे पालन करत प्रभू येशू खिस्ताने शिकविलेल्या व गांधीजींनी जीवनात अनुसरलेल्या अिहसेच्या मार्गाने शांततापूर्ण मूक निषेध करीत देशात शांती नांदण्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

वसई धर्मप्रांतातदेखील आर्चबिशप फेलिक्स मच्याडो यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १० वाजता शांततापूर्ण निषेध सभांचे आयोजन करण्यात आले. या वेळी सर्वानी धर्मग्रंथाचे शांतपणे वाचन व मूक प्रार्थना केली. आर्चबिशप फेलिक्स मच्याडो यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत इतर भाविकांनीही आपापल्या घरून उपवास व प्रार्थनेद्वारे या उपक्रमात सहभागी दर्शविला. या वेळी मानवतावादी दृष्टिकोनातून परस्पर बंधुप्रेम, एकमेकांच्या श्रद्धेबद्दल आदरभाव व आपसात परस्पर सहकार्याची व सांमजस्याची भावना सर्व देशवासीयांमध्ये वाढीस लागावी, अशा सदिच्छा मनोमन व्यक्त करण्यात आली.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Protest against attacks christian community ysh

ताज्या बातम्या