मीरा रोड ते वैतरणादरम्यान तीन वर्षांत रेल्वे दुर्घटनांत ४१७ जणांचा मृत्यू

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्पेश भोईर

वसई: अनेक उपाय करूनही रेल्वे अपघाताचे प्रमाण कमी होत नाही उलट त्यात वाढ होऊ लागली आहे. मागील तीन वर्षांत मीरा रोड ते वैतरणा यादरम्यान रेल्वे अपघातात  ४१७ जणांचा बळी गेला आहे. तर ३६१ जण जखमी झाले आहेत. यातील सर्वाधिक अपघात हे रेल्वे रूळ ओलांडताना आणि रेल्वेमधून पडल्याने झाले आहेत. 

मीरा रोड ते वैतरणा अशी वसई रेल्वे पोलीस ठाण्याची हद्द आहे. यात एकूण सात स्थानकाचा समावेश आहे. मागील काही वर्षांत यातील विविध स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या भरमसाठ वाढली आहे. त्यामुळे अपघातांच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. यात रेल्वे रूळ ओलांडून जाणे, लोकलमध्ये लटकून प्रवास करणे, रेल्वे मार्गातून प्रवास करणे, अतिघाईने चढउतार करणे अशा विविध प्रकारच्या कारणामुळे अपघात होत असतात. २०१९ मध्ये रेल्वे अपघातांत २१२ जणांचा मृत्यू झाला होता व २३६ जण जखमी झाले होते. त्यानंतर  करोनाच्या संकटामुळे ही लोकल सेवा अत्यावश्यक सेवा वगळता इतर प्रवाशांना प्रवासासाठी बंद होती. त्यामुळे रेल्वे अपघाताचे प्रमाण कमी झाले होते.

२०२० मध्ये रेल्वे अपघातात ९५ जणांचा मृत्यू तर ६८ जण जखमी झाले होते. आता करोनाचे संकट निवळताच सर्व काही सुरळीत सुरू झाले आहे.  रेल्वे प्रवासावरील निर्बंध ही शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वर्दळ वाढू लागली आहे. त्यामुळे रेल्वे अपघातांचे प्रमाणातही हळूहळू वाढ होत  आहे. चालू  वर्षांत ऑक्टोबपर्यंत १० महिन्यात अपघातात १११ जणांचा मृत्यू झाला आहे. व ५७ जण जखमी झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत रेल्वे अपघाती मृतांच्या संख्येत १६ ने वाढ झाली आहे.

दुसरीकडे प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नये यासाठी व्यवस्था केली आहे. मात्र तरी सुद्धा काही प्रवासी अतिघाईने तर कधी नजर चुकवून रेल्वे ओलांडत असल्याने अपघात घडत असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले आहे.

रेल्वे अपघात कमी होण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात. तसेच विविध स्थानकात गस्तही रेल्वे पोलिसांकडून घातली जात आहे. तसेच फटका मारणाऱ्या टोळीवरही लक्ष ठेवले जाते. प्रवाशांनीही थोडी सावधानता बाळगून प्रवास करणे गरजेचे आहे, असे वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन इंगवले यांनी सांगितले.

रेल्वे पोलिसांची सतर्कता..

रेल्वे स्थानकात व रेल्वे रुळावर विविध प्रकारच्या अपघाताच्या घटना घडतात मागील दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये वसई रेल्वे पोलिसांनी तीन जणांचे प्राण वाचविले आहेत. यात वसई रेल्वे स्थानकात अल्पवयीन मुलगा लोकल गाडी मधून उतरत असताना तोल जाऊन खाली पडला होता. त्याला तातडीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले होते. तर भावनगर या एक्स्प्रेसमधून प्रवास करताना एक ७० वर्षीय वयोवृद्ध महिला गाडीखाली गेली होती. तिला ही बाहेर काढून तिचे प्राण वाचविले आहेत. तर एक महिला रेल्वे रुळावर आत्महत्या करण्यासाठी आली होती. मोटारमन तिला इशारा देऊन लोकल थांबवून तिला बाजूला करून प्राण वाचविले असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

असे ही घडतात रेल्वे अपघात

काही वेळा रेल्वेस्थानकात एखादी गाडी ही नियमित ठरलेल्या फलाटावर न येता अचानकपणे  दुसऱ्या फलाटावर येते. अशा वेळी गाडीची वाट बघत असलेल्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडते तर काही प्रवासी चक्क रेल्वे रुळावर उडय़ा टाकून घाईने घाईने गाडी पकडण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारामुळेही अपघात घडत असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway accident season continues ysh
First published on: 19-11-2021 at 00:51 IST