वसई : मागील काही दिवसांपासून नायगाव पूर्वेच्या जूचंद्र रेल्वे फाटकात रेल्वे कडून काम सुरू केले आहे. मात्र या कामादरम्यान नियोजनाचा अभाव असल्याने नागरिकांना ये जा करण्यास अडथळे निर्माण होऊ लागले आहेत. सोमवारी सकाळच्या सुमारास ही रुळावर टाकण्यात आलेल्या खडीमुळे शेकडो वाहने त्यात अडकून प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती.

नायगाव पूर्वेकडील बाजूस जूचंद्र परिसर आहे. त्याभागातून बापाणे ते नायगाव असा नायगाव स्थानक व महामार्गाला जोडणारा मुख्य रस्ता गेला आहे या रस्त्याच्या मधूनच वसई ते दिवा लोहमार्ग गेलेला आहे. त्या लोहमार्गावरून मालवाहतूक गाड्या व प्रवासी वाहतूक गाड्या सुरु असतात यासाठी जूचंद्र येथे रेल्वे फाटक बसविण्यात आले आहे. या रेल्वे फाटकाच्या मध्ये व मुख्य रुळावर मागील काही दिवसांपासून रेल्वेने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. रात्री पासून सकाळी पहाटेपर्यंत हे काम चालू असते. फाटकाच्या मधूनच ये जा करण्याचा मार्ग असल्याने काम संपल्यानंतर तेथील रस्ता पूर्ववत करणे गरजेचे आहे. मात्र रेल्वेने त्या मार्गात केवळ खडी टाकून ठेवली आहेत.

या खडी वरून रिक्षा, दुचाकी, यासह इतर वाहनांची चाकं जागेवरच घसरून अडकू लागली आहेत. सोमवारी सकाळच्या सुमारास ही अशाच प्रकारे रेल्वे फाटकात शेकडो वाहने अडकली होती. त्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होऊन प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे फाटकाच्या दोन्ही बाजूनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रुळावरील खडीमुळे काही वाहनांना तर अक्षरशः धक्का मारून बाहेर काढावी लागली असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. रेल्वेच्या या नियोजन शून्य कामाचा फटका सकाळी कामावर जाण्यास निघालेले नागरिक, शाळकरी विद्यार्थी यांना बसला असल्याचे चित्र दिसून आले.

रेल्वेने काम झाल्यानंतर फाटकाच्या मधील ये जा करण्याचा मार्ग पूर्ववत करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.नागरिकांच्या अडचणी लक्षात घेता रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यावर उपाययोजना करण्यास सांगितले जाईल असे पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी सांगितले आहे. जूचंद्र रेल्वेच्या ठिकाणी निर्माण होत असलेली समस्येच्या संदर्भात संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना कळवून त्याठिकाणी उपाययोजना केल्या जातील असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले आहे.

ऐन सणासुदीला कोंडीचे विघ्न

आता गणेशोत्सवाचा सण जवळ आला आहे. या सणाच्या विविध प्रकारच्या कामांची लगबग सुरू आहे मात्र ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. यापूर्वी रक्षाबंधनच्या सणाच्या दिवशी सुद्धा प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता.