भाईंदर : पावसाची विश्रांती मिळूनही मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सलग चौथ्या दिवशी वाहतूक कोंडी कायम असल्याचे समोर आले आहे. परिणामी, या कोंडीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत.मुंबई व उपनगरांत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे दोन दिवसांपूर्वी मुंबई–अहमदाबाद महामार्ग पाण्याखाली गेला होता. दरम्यान, काल दुपारपासून पावसाला काहीशी विश्रांती मिळाल्याने महामार्गावरील पाणी पूर्णपणे गेले आहे. मात्र, साचलेल्या पाण्यामुळे महामार्गावर मोठे खड्डे पडले असून त्यामुळे प्रवास अधिकच कठीण झाला आहे. त्यातच महामार्गावरील उड्डाणपुल, रस्ते उभारणी आणि इतर सुरू असलेल्या कामांमुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
या अडचणींमुळे मार्ग काढणे वाहनधारकांसाठी अवघड ठरत असून वाहतूक मंदावली आहे. प्रामुख्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहने धावत असल्याने सकाळच्या गर्दीच्या वेळीच कोंडी तीव्र होते. विशेषत: घोडबंदर येथील सगनई नाक्याजवळ (छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा परिसर) वाहनांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. परिणामी, मिरा भाईंदर शहराच्या अंतर्गत भागात जाणाऱ्या मार्गांवर देखील वाहतूक कोंडी निर्माण झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
वाहतूक पोलिसांवर नाराजी
मिरा भाईंदर–वसई विरार पोलीस आयुक्तालय हद्दीतील मुंबई–अहमदाबाद महामार्गाची जबाबदारी स्थानिक पोलीस प्रशासनाकडे सोपवण्यात आली आहे. मात्र, असे असतानाही महामार्गावरील प्रमुख कोंडीच्या ठिकाणी एकही वाहतूक कर्मचारी दिसत नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. दुसरीकडे, महामार्ग तसेच घोडबंदर मार्गावर अनेक पोलीस कर्मचारी तैनात करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू असल्याचा दावा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आला आहे.