अतिरिक्त भाडेवाढीला चाप लावण्याची प्रवाशांची मागणी

विरार :  प्रशासनाने मध्यस्थी करूनही रिक्षा भाडेवाढीला चाप बसलेला नाही. त्यामुळे अतिरिक्त भाडेवाढ टाळण्यासाठी प्रवाशांनी मीटरप्रमाणे रिक्षा सुरू करण्याच्या मागणीची जोरदार मागणी केली आहे. परंतु प्रशासनदरबारी हा प्रस्ताव बासनात पडून आहे. वसई विरार शहराचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आराखडय़ात समावेश झाल्यानंतर उप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शहरात मीटर रिक्षा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. पण ग्रामीण भाग असल्याने प्रवाशांना भाडे परवडणार नाही, यामुळे एकूण मीटर दर आकारणीवर ३ टक्के वाढ करत. त्याचे ३ प्रवासी भाडय़ात विभागणी करून सामूहिक पद्धतीने रिक्षा चालवण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर रिक्षाचे किमान प्रति प्रवासी भाडे १० रुपये करण्यात आले होते. त्यातही केवळ तीन प्रवासी मर्यादा ठरविण्यात आली होती.

करोनाकाळात रिक्षा वाहतुकीवर बंदी आल्याने रिक्षाचालकांची मोठी आर्थिक कोंडी झाली. केवळ २ प्रवासी मर्यादा ठेवून रिक्षाना परवानगी देण्यात आली होती. या वेळी रिक्षाचालकांनी भाडेवाढ करत किमान भाडे २० रुपये केले. पण करोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतरही ही वाढ कायम असल्याने प्रवासी संघटनांनी रिक्षाप्रवासावर बहिष्कार टाकला. त्या वेळी उप्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतूक शाखा, प्रवासी संघटना आणि रिक्षाचालक मालक संघटना यांनी एकत्रित चर्चा करून हा विषय सोडवला होता. एक किंवा दोन प्रवासी असतील तर २० रुपये आणि तीन प्रवासी असतील तर १० रुपये आकारावे असे सांगितले मात्र रिक्षाचालकांनी भाडय़ात घट केलीच नाही, याचा आर्थिक फटका बसत असल्याने आता मीटरप्रमाणे रिक्षा सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवासी करत आहेत. 

मीटर सक्ती पण..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उप्रादेशिक परिवहन कार्यालयातून रिक्षांना मीटर सक्ती करण्यात आली आहे. परंतु रिक्षात मीटर असले तरी ते चालू नाहीत. त्यामुळे सक्तीचा फार्स कशासाठी, असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत. उप्रादेशिक परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मीटरप्रमाणे किमान १.५ किलोमीटरसाठी २१ रुपये दर आहे. तर प्रवासी संघटनांच्या माहितीनुसार रिक्षाचालक एका प्रवाशाकडून २० रुपये घेतात आणि असे ३-४ प्रवासी नेत असल्याने एका फेरीत रिक्षाचालक ८० रुपयांची कमाई करतात.