scorecardresearch

शहरबात: ‘सेक्सटॉर्शन’चे आव्हान

बनवाट अश्लिल छायाचित्रांच्या आधारे ब्लॅकमेल करून खंडणी मागण्याचे प्रकार वाढले आहेत.

( प्रतिनिधिक छायाचित्र )

सुहास बिऱ्हाडे
बनवाट अश्लिल छायाचित्रांच्या आधारे ब्लॅकमेल करून खंडणी मागण्याचे प्रकार वाढले आहेत. सायबर भामटे विविध माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना अशा प्रकारे ब्लॅकमेल करत आहे. कधी पूर्वी फेसबुकवर मुलीच्या नावाने बनावट प्रोफाईल तयार करून नंतर कर्ज देणाऱ्या ॲपच्या माध्यमातून, ते लोकांना संपर्क करून जाळय़ात ओढून त्यांना अडकवत होते. आता तर थेट कुणाच्याही व्हॉटसअप क्रमांकावर कॉल करून फसवले जात आहेत. आपला खासगी मोबाइल क्रमांक या सायबर भामटय़ांच्या हाती लागला आहे. त्यामुळे हा धोका आपण केलेल्या कल्पनेपेक्षाही जास्त आहे.
डिजिटल युगात क्रांती झाली आणि समाजमाध्यमे तसेच ऑनलाइन व्यवहारांचा वापर वाढला. त्याचबरोबर सायबर भामटे देखील वाढले. विविध प्रकाराने, शक्कल लढवून ते नागरिकांची फसवणूक करत असतात. आता या सायबर भामटय़ांनी नवीन मार्ग शोधला आहे. तो म्हणजे अश्लिल छायाचित्रांच्या आधारे खंडणी मागण्याचा. त्याला इंग्रजीत ‘सेक्सटॉर्शन’ असे म्हणतात.

महिलांची अश्लिल छायाचित्रे तयार करून खंडणी मागितली जात असते. पण या प्रकारात पुरुषांना जाळय़ात ओढून त्यांच्याकडून अश्लिल छायाचित्रांच्या आधारे खंडणी मागण्यात येते. साधाऱणपणे सर्वच वयोगटातील नागरिक फेसबुकसारख्या समाजमाध्यमांचा वापर करत असतात. त्यामुळे फेसबुकद्वारे सावज हेरण्याचे प्रकार सुरू झाले होते. पायल शर्मा, स्वीटी शर्मासारख्या मुलींच्या नावाने फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवली जायची. सुंदर चेहऱ्याच्या मुलीचे छायाचित्र ठेवले जायचे. ही फेसबुक रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर ती मुलगी मेसेंजरवर येऊन चॅट करते आणि मग अश्लिल संभाषण करण्यास उद्युक्त करते. काही त्याला बळी पडायचे. मग त्या अश्लिल संभाषणाची चित्रफीत रेकॉर्ड करून खंडणी मागितली जायची. बदनामीला घाबरून संबंधित व्यक्ती बळी पडायची आणि पैसे द्यायची. आता त्यांनी आता थेट व्हॉटस अॅूपवर संपर्क करण्यास सुरुवात केली आहे.

असा आहे फसवणुकीचा नवीन प्रकार
वसईतील एका व्यापाऱ्याला असाच अनुभव आला. हा व्यापारी व्हॉटसअपवगळता कसलाच वापर करत नव्हता. त्याला व्हॉटसअपवर अनोळखी क्रमांकावरून एका तरुणीने संपर्क केला. चुकीचा नंबर असेल असे त्याला वाटले. मात्र त्या अनोळखी तरुणीने त्यांना व्हॉटअसप कॉल केला. त्यांनी तो उचलला आणि समोर असलेल्या तरुणीने त्यांना उद्युक्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तो कॉल कट केला पण त्याचवेळी व्हिडीयोकॉलवरून त्यांचे चित्रण रेकॉर्ड केले आणि मग बनावट चित्रफीत बनवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. वसईतील एक बहुराष्ट्रीय कंपनीतील तरुणालाही त्याच्या कुटुंबीयांची वैयक्तिक छायचित्रे व्हॉट्सअपवर पाठवून त्याच्या बदनामीची धमकी देत खंडणी उकळण्यात आली. फेसबुकवरून मुलींच्या नावाने बनवाट रिक्वेस्ट येते आणि फसवणूक होते यााबबत जनजागृती झाल्यानंतर नागरिक अशा बनवाट प्रोफाईलपासून सावध होऊ लागले. पण सायबर भामटे त्यातही पुढे गेले. त्यांनी आता थेट व्हॉटसअप क्रमांक मिळवून जाळय़ात ओढायला सुरुवात केली आहे. व्हॉटसअपवर संपर्क करायचा जुजबी संभाषण करायचं आणि थेट व्हॉट्सअप कॉल करायचा. त्याच वेळेस तो व्हॉटसअॅबप कॉल रेकॉर्ड करून नंतर त्याला अश्लिल चित्रफीत जोडली जाते. त्या आधारे बदनामीची धमकी देऊन पैसे उकळले जातात. सायबर भामटय़ांच्या या नवीन पद्धतीने सध्या दहशत माजवली आहे. जवळपास संपूर्ण देशातील पोलीस ठाण्यात अशा प्रकारच्या तक्रारींचा दररोज पाऊस पडत असतो. समाजमाध्यमांचा वापर करा अथवा करू नका सायबर भामटे तुमच्या दाराशी येऊन धडकले आहेत.

सायबर भामटय़ांचा धोका
आता प्रश्न पडतो की आपला खासगी व्हॉट्सॲप क्रमांक सायबर भामटय़ांच्या हाती लागतो कसा? पण आपला व्हॉट्सअप क्रमांकाची गोपनीयता केव्हाच संपली आहे हे आपल्या लक्षात येत नाही. विविध ॲप डाऊनलोड करण्यापासून अगदी मॉलमधील दुकानात खरेदी करताना आपण आपला व्हॉटसअप क्रमांक देत असतो. बँकांपासून विविध ठिकाणी आपला आधार कार्ड क्रमांक देत असतो. आपली ही माहिती अशाच ठिकाणांहून सायबर भामटे मिळवू लागले आहेत. त्याचा गैरवापर करून फसवणूक केली जाते. आपल्यालाच का कॉल येतात असा प्रश्न पडेल. मात्र सायबर भामटय़ांना तुम्ही कोण आहात हे माहिती नसते. ते फक्त एक खडा मारून बघत असतात. ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकाराला फिशिंग असे म्हणतात. तलावातील मासे पकडण्यासाठी गळाला खाद्य लावून ते पाण्यात सोडले जाते. तलावात हजारो मासे असतात. पण एखादा मासा त्या गळाला लागतो. सायबर भामटय़ांची पद्धतदेखील अशीच आहे. हजारो लोकांना कॉल करायचे त्यातील एक गळाला लागतो. म्हणून त्याला फिशिंग म्हटले जाते.

काय काळजी घ्यावी?
या वाढत्या प्रकारांमुळे सायबर साक्षरता किती महत्त्वाची आहे, याची नितांत गरज निर्माण झाली आहे. पण कळत नकळत नागरिक या सेक्सटॉर्शनच्या जाळय़ात फसत असतात. समजा एखाद्या व्यक्तीने फेक प्रोफाईलवरील मुलीच्या आमिषाला बळी पडून तिच्याशी खरेच अश्लिल संभाषण केले असेल तर तो घाबरतो. कारण त्याची चित्रफित त्या भामटय़ांच्या हातात असते आणि ते ऑनलाइन टाकण्याची धमकी देत असल्याने ती व्यक्ती पैसे देते. मात्र खरीखुरी अश्लिल चित्रफीत ते कुठेच अपलोड करत नाहीत. कारण तसे केले तर ते पकडले जाण्याची शक्यता असते. दुसरे म्हणजे कुणा व्यक्तीची बदनामी करणे हा त्यांचा हेतू नसतो. त्यांना फक्त पैसे उकळायचे असतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिला तर ते सरळ दुसऱ्या सावजाकडे वळतात. त्यामुळे तुमची खरी अश्लिल चित्रफीत असो वा नसो या सायबर भामटय़ांकडे दुर्लक्ष करणे हाच सोप्पा उपाय. आर्थिक व्यवहार करूच नये आणि फारच त्रास होत असेल तर थेट पोलीस ठाणे गाठावे. कारण दररोज अशा अनेक तक्रारी येत असल्याने आर्थिक फसवणूक झाल्याशिवाय पोलीसही गुन्हा दाखल करत नाहीत. याशिवाय प्राथमिक सायबर सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. पासवर्ड नियमित बदलणे, आपले समाजमाध्यमांवरील प्रोफाईल लॉक ठेवणे आवश्यक आहे. या जगात फुकट काहीच मिळत नाही, हे कायम लक्षात ठेवावे. त्यामुळे आंतरजालावर फुकट मिळणाऱ्या कसल्याही आमिषाला बळी पडू नये. विनामूल्य किंवा घसघशीत सवलतींच्या मोहाला बळी पडलो की तेथून सायबर भामटय़ांचे काम सुरू होते. त्यामुळे खबरदारी घेणे हाच सध्याचा सोप्पा मार्ग आहे.

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sextortion pornographic photographs blackmail medium amy

ताज्या बातम्या