भाईंदर : मिरा रोड येथील शीतल नगर गृहसंकुलाच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. येथील अंतर्गत ९ मीटर रस्ता हा १२ मीटर करण्यासाठी महापालिकेने शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे.शीतल नगर हा मिरा रोडमधील अनेक गृहसंकुलांचा परिसर आहे. ग्रामपंचायत कालावधीत येथील इमारती बांधकामास सुरुवात झाली होती. त्यानंतर १९९८ साली मिरा भाईंदर नगरपरिषदेने येथील इमारतींना भोगवटा दाखले देण्यास सुरुवात केली. परिणामी या इमारती आता जुन्या झाल्यामुळे मोडकळीस येऊ लागल्या असून त्यांचा पुनर्विकास करणे अत्यावश्यक झाले आहे.
शासनाच्या नव्या एकत्रित विकास नियंत्रण नियमावलीनुसार पुनर्विकास करताना सदनिका धारकांना ठराविक चौरस मीटरपर्यंत सदनिका देणे बंधनकारक आहे. नवीन इमारतींसाठी बांधकाम परवानगी ही प्रामुख्याने जवळील रस्त्याच्या रुंदीवर अवलंबून असते. शीतल नगर भागातील सर्वे क्रमांक ७२९, ७३२ आणि ७३३ येथील अंतर्गत रस्ते केवळ ९ मीटर रुंद असल्याने येथे २४ मीटरपेक्षा उंच इमारत बांधण्यास परवानगी मिळणे कठीण होते. त्यामुळे संपूर्ण चटई क्षेत्र निर्देशांकाचा (एफएसआय) वापर होऊ शकत नसल्याने विकासक या ठिकाणी नवे बांधकाम करण्यास तयार होत नव्हते, परिणामी जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचे काम रखडले होते. त्यामुळे येथील रस्त्याची रुंदी वाढवण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत होती.
धोकादायक इमारतींचा पुनर्विकास आणि भविष्यातील वाहनवाहतुकीची गरज लक्षात घेऊन हा रस्ता ९ मीटरवरून १२ मीटर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी महापालिकेच्या नव्या विकास आराखड्यात रस्त्याच्या रुंदीचा समावेश करण्यात आला असून आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी प्रशासकीय ठराव मंजूर करून २७ जुलै २०२५ रोजी शासनाला प्रस्ताव पाठवला आहे.
विशेष वागणूक का?
मिरा रोड येथील शीतल नगर भागातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी अनेक विकासक सक्रिय झाले आहेत. मात्र येथील रस्त्याची रुंदी केवळ ९ मीटर असल्याने पुनर्विकासात अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे हा रस्ता ९ मीटरऐवजी १२ मीटर करण्याची मागणी स्थानिक गृहसंकुल धारकांकडून सातत्याने केली जात होती.अशीच समस्या शहरातील इतर काही भागांतही आहे. तरीदेखील प्रशासनाने केवळ शीतल नगरसाठीच हा विशेष निर्णय घेतल्यामुळे इतर भागातील नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.