भाईंदर: मिरा भाईंदर शहरात डंपरद्वारे वाहतुकी दरम्यान माती खाली पडून रस्त्याची दुरवस्था होत असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे रस्ते निसरडे होऊन अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तर महापालिकेच्याच सुरू असलेल्या कामाचा हा फटका बसत असून कारवाईकडे प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
मिरा भाईंदर शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामातून टाकाऊ राडारोडा (डेब्रिज) व माती निघते.यापूर्वी हा रोडा जमा करण्यासाठी महापालिकेकडून कोणतेही सुविधा उपलब्ध करून दिली जात नव्हती.त्यामुळे बांधकाम व्यावसायिक हा राडारोडा रस्त्याच्याकडेला किंवा मोकळ्या जागेत जाऊन टाकत होते.मात्र प्रशासनाकडून काही महिन्यापूर्वीच राडारोड्या संदर्भात धोरण निश्चित करण्यात आले असल्यामुळे रस्त्याच्या कडेला होणाऱ्या भरावाची संख्या कमी झाली आहे.मात्र राडारोडा वाहतुकीचा प्रश्न कायम असल्याचे दिसून येत आहे.
प्रामुख्याने राडारोडा वाहतुकीसाठी महापालिकेने तीन महिन्यापूर्वीच नवी नियमावली तयार केली आहे.यात राडारोडा वाहतूक करणाऱ्या डंपरना ताडपत्रीने पूर्ण झाकण्याचे त्यात आदेश आहे. यामुळे वाहतूक होणारा मलबा खाली पडणार किंवा दिसणार नाही. मात्र असे असताना देखील शहरात सर्रासपणे डंपरची वाहतूक केली जात आहे. यामुळे रस्त्यावर सर्वत्र माती व राडारोडा पडून रस्ते निसरडे होत आहे.
यापूर्वी अशाच मातीमुळे दुचाकी स्वार प्रवाशाचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यामुळे प्रशासनाने रस्ते सुरक्षेसाठी या डंपर चालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.तर शहरातील डंपर चालकांवर कारवाई करण्यासाठी चार ठिकाणी तपासणी केंद्र उभारण्यात आले असून त्याद्वारे कारवाई सुरु असल्याचा दावा उपायुक्त सचिन बांगर यांनी केला आहे.
महापालिकेच्या कामाचा फटका
भाईंदर पश्चिम येथे मांडवी तलावाच्या सुशोभीकरणाचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे.या दरम्यान तलावातील माती काढून टाकण्याचे काम केले जात आहे.मात्र मातीची ही वाहतूक करत असताना नियमानाकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले आहे. परिणामी वाहतुकी दरम्यान ही संपूर्ण माती रस्त्यावर पडत असते. यामुळे रस्ते निसरडे होत असून येणाऱ्या प्रवाशांना अन्य त्रास देखील होत आहे. एकीकडे शहरातील विकासकांना नियमांचे काटेकोर पणे पालन करण्यास भाग पाडणारी महानगरपालिका स्वतःच्या कामाकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.