वसई: दिवाळीनंतर चातुर्मास संपल्याची आणि विवाहसोहळ्यांची सुरुवात करणारा तुळशी विवाह हा सण वसई-विरार शहरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या सोहळ्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे ऊस.
तुळशी विवाहासाठी तुळशी वृंदावनाभोवती मांडव उभारण्यासाठी आणि तोरण बांधण्यासाठी उसाचा वापर केला जातो. यात, स्थानिक हिरव्या उसापेक्षा कोल्हापूर आणि सोलापूर भागातून विशेषतः आणल्या गेलेल्या गडद जांभळट-काळ्या रंगाच्या उसाला अधिक मागणी आहे.
एरवी रसवंती गृहात आढळून येणाऱ्या हिरव्या ऊसाच्या तुलनेत काळ्या ऊस त्याच्या गडद रंगामुळे उठून दिसतो. तसेच हा ऊस तुलनेने जास्त गोड आणि अधिक टिकाऊ मानला जातो, ज्यामुळे शुभ कार्यात त्याचे महत्व वाढते.
वसई विरार शहरातील विविध बाजारपेठांमध्ये तसेच रस्त्यालगच्या भाजी विक्रेत्यांकडे आणि फळ विक्रेत्यांकडे तुळशी विवाहानिमित्त मोठ्या प्रमाणावर ऊस विक्रीसाठी आल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातून मागवण्यात आलेला काळ्या रंगाचा ऊस सध्या शंभर रुपयांना विकला जात आहे. तर काळ्या ऊसाच्या एका तुकड्याचा दर तीस रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे.
रसवंतीगृहात तसेच वर्षभर आढळून येणारा हिरवा ऊस मात्र काळ्या उसाच्या तुलनेत स्वस्त आहे. हिरव्या उसाच्या एका काडीची किंमत साठ रुपये आहे. तर एका तुकड्याची किंमत दहा रुपये आहे. पण, तरीदेखील बाजारात काळ्या उसाला ग्राहकांकडून पसंती मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे.
अवकाळी पावसातही मोठी आवक
महाराष्ट्र झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील विविध जिल्ह्यात हंगामी पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. असे असले तरी दरवर्षी एकादशीनंतर बाजारात दाखल होणारा काळा ऊस यंदाही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला आहे. अवकाळी पावसामुळे उसाच्या दरात जरी वाढ झाली असली, तरी ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर काळ्या उसाची खरेदी केली जात आहे.
तुळशी विवाहात ऊसाचे महत्त्व काय?
तुळशीच्या लग्नासाठी वृंदावनाभोवती ऊस उभा करून विवाह मंडप तयार केला जातो. हा ऊस विवाहाच्या पवित्र मांडवाचे प्रतीक मानला जातो, जिथे तुळस आणि शाळीग्राम यांचा विवाह संपन्न होतो. काही पारंपरिक विधींमध्ये तुळशीच्या लग्नात उसाला मामाचे स्थान दिले जाते. तुळस ही कन्या मानली जाते आणि ऊस हा तिच्या मामाप्रमाणे विधीमध्ये सहभागी होतो, अशी धारणा आहे. तसेच ऊस हे समृद्धी, गोडवा आणि उत्तम आरोग्याचे प्रतीक मानले जाते. या शुभ मुहूर्तावर ऊस अर्पण केल्याने घरात धनधान्य व गोडवा येतो, अशी अनेकांची धार्मिक श्रद्धासुद्धा आहे.
