भाईंदर : भाईंदर येथील महालिकेच्या तलावात बुडून एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्यानंतर क्रीडा संकुल बंद करण्यात आले होते. अखेर घटनेच्या तीन महिन्यानंतर संकुलाच्या संचालन व देखभालची जबाबदारी स्वीकारत ते सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
भाईंदर मधील गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुलात एप्रिल महिन्यात नऊ वर्षीय ग्रंथ मूथा(९) या मुलाचा तरणतलावात बुडून मृत्यू झाला होता. महापालिकेने स्थापन केलेल्या चौकशी समितीने या दुर्घटनेला संकुलातील व्यवस्थापनाची निष्काळजी कारणीभूत असल्याचे नमूद केले आहे. याप्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास सुरू आहे.या घटनेनंतर आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी संकुल चालवणाऱ्या ‘साहस चॅरिटेबल संस्था’ला नोटीस बजावली होती आणि क्रीडा विभागाला संकुल बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून संकुल बंद होते. मात्र नागरिक आणि सदस्यांकडून संकुल पुन्हा सुरू करण्याची मागणी होत होती.
दरम्यान आता प्रशासकीय स्तरावर आवश्यक ती कार्यवाही पूर्ण झाल्यामुळे आयुक्तांनी १ ऑगस्ट २०२५ रोजी संकुल पुन्हा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. संकुलातील इमारतींचा आढावा घेऊन पुढील पंधरा दिवसांत संकुल सुरू करण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.प्रशासनाने संकुलाच्या संचालन व देखभालीची जबाबदारी स्वीकारली असून, संकुल बंद असताना सदस्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीबाबत लेखापरीक्षकांना अहवाल तयार करून १५ दिवसांत सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
तरणतलाव मात्र बंदच
क्रीडा संकुलातील तरणतलावात बुडून मुलाचा मृत्यू झाल्याची घटना गंभीर स्वरूपाची असल्याने याबाबतचा पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत तरणतलाव बंद ठेवण्यात येणार आहे. तरणतलावा व्यतिरिक्त इतर सर्व सुविधा नागरिकांसाठी खुल्या राहणार असल्याचे आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.
ग्रंथच्या कुटुंबियांना ५ लाखांची नुकसानभरपाई
संकुलातील व्यवस्थापनेच्या निष्काळजीपणामुळे ग्रंथ मूथा याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करून आयुक्तांनी ग्रंथच्या वडिलांना नुकसानभरपाई म्हणून ५ लाख देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम संकुल चालवणाऱ्या संस्थेने प्रशासनाकडे जमा केलेल्या अनामत रकमेतून वजा केली जाणार आहे.