दैनंदिन खर्चात वाढ; विविध अडचणींची समस्या

वसई : पालघर जिल्ह्यातून एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाल्याने आधीच एसटीला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यातच आता इंधनाच्या किमतीतही दिवसेंदिवस वाढ होत असल्याने त्याचाही फटका एसटीला बसला आहे. प्रति किलोमीटर चार रुपये इतक्या खर्चाची वाढ झाली आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर जिल्ह्यात वसई, अर्नाळा, नालासोपारा, बोईसर, डहाणू, सफाळे, जव्हार, पालघर असे एसटी महामंडळाचे आठ आगार आहेत. यातून ग्रामीण, शहरी व इतर लांब व मध्यम पल्याच्या गाडय़ा सोडल्या जातात. यातून मोठय़ा संख्येने प्रवासी प्रवास करतात. करोना निर्बंध शिथिल होत असल्याने जनजीवनही पूर्वपदावर येऊ लागले आहे. तरी सध्याच्या स्थितीत प्रवाशांची संख्या फारच कमी झाली आहे. तर दुसरीकडे इंधनाच्या किमतीही झपाटय़ाने वाढू लागल्या आहेत. पेट्रोल शंभरीपार तर डिझेल त्याच्या जवळपास गेले आहे. याचा परिणाम एसटीवर झाला आहे. त्यामुळे दिवसाचा खर्च काढताना आगार व्यवस्थापक व विभाग नियंत्रक यांच्यापुढे अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.

सुरुवातीला डिझेलचा खर्च हा १७ ते १८ रुपये प्रति किलोमीटर इतका होत. तोच आता २१ ते २२ रुपये प्रति किलोमीटर झाला आहे. म्हणजेच प्रति किलोमीटर चार रुपये वाढ झाली आहे. एसटीच्या गाडय़ांना दररोज २५ हजार लिटर इतके इंधन (डिझेल) लागते. म्हणजेच दिवसाला २२ ते २३ लाख रुपये त्यावर खर्च होतात. सुरुवातीच्या इंधनदरापेक्षा आताच्या दरात जवळपास २० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे पाच ते सहा लाख रुपयांची अतिरिक्त भर पडली असल्याची माहिती पालघर विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांनी दिली आहे.

प्रवाशांची संख्या कमी झाल्याने त्यातून मिळणारे उत्पन्न हे कमी झाले आहे. असे जरी असले तरी सर्व ठिकाणच्या मार्गावर हजारो लिटर डिझेल फुकून प्रवाशांना सेवा द्यावीच लागत आहे. इंधनाच्या किमती इतक्या वाढल्या आहेत की डिझेलचा टँकर मागवितानाही विचार करावा लागतो. कारण डिझेलचे पैसे देण्यासाठीही तिजोरीत तितकी रक्कम जमा झाली नसेल तर अडचणी निर्माण होत असल्याचे वसई आगार व्यवस्थापक दिलीप भोसले यांनी सांगितले आहे.

सद्य:स्थितीत जिल्ह्यातून एसटीच्या ३३० गाडय़ा सुरू आहेत. करोनाकाळापूर्वी दररोज एसटीचा राज्यभर एक लाख २० हजार किलोमीटर इतका प्रवास होत होता. तर आता एक लाख चार हजार किलोमीटर इतका प्रवास सुरू आहे.

उत्पन्नवाढीसाठी प्रवासी संख्या वाढविण्यावर भर

करोनाकाळात एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फारच कमी झाली आहे.  याचा आर्थिक फटका एसटीला बसत आहे. प्रवाशांची संख्या वाढावी यासाठी महत्त्वाच्या गर्दीच्या ठिकाणी कर्मचारी ठेवण्यात आले आहेत. जर त्या ठिकाणी प्रवासी असतील तर बसमध्ये बसवायचे. चालक-वाहक यांच्याकडून नोंदी घेणे तसेच ठरावीक मार्गावर प्रवासी वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत.

इंधनाच्या (डिझेल) किमती वाढल्याने दैनंदिन खर्चातही वाढ झाली आहे. परंतु पालघर विभागातून सद्य:स्थितीत प्रवासी संख्या कमी आहे. त्यामुळे वाढीव खर्चाचे नियोजन करण्यास अडचणी येत असतात.

– राजेंद्र जगताप, विभाग नियंत्रक, पालघर एसटी महामंडळ

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: St journey tough due to fuel price hike ssh
First published on: 17-07-2021 at 01:40 IST