भाईंदर :- उत्तन येथील महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाचे पत्रे वाऱ्यामुळे उडून मोडकळीस येत आहेत. त्यामुळे एखाद्या प्रसंगी हे पत्रे घरांवर किंवा नागरिकांच्या अंगावर येऊन आदळण्याची भीती निर्माण झाली आहे. उत्तन येथील धावगी डोंगरावर महापालिकेचा घनकचरा प्रकल्प आहे. काही काळ कचऱ्यावर प्रक्रिया थांबवण्यात आल्यामुळे सुमारे आठ लाख मॅट्रिक टन कचऱ्याचा डोंगर याठिकाणी उभा राहिला आहे. प्रशासनाकडून या कचऱ्यावर मातीचा थर अथवा कोणतेही रसायन टाकले जात नसल्यामुळे स्थानिक नागरिक दुर्गंधीमुळे त्रस्त झाले आहेत.
या समस्येवर वारंवार आंदोलन व तक्रारी झाल्यानंतर, प्रशासनाने साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मागील काही वर्षांत बायोमायनिंग, खतनिर्मिती आणि प्लाझ्मा प्रकल्प उभारले आहेत. या प्रकल्पांसाठी पत्र्याचे बांधकाम करण्यात आले. मात्र, मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यांमुळे ही पत्रे मोडकळीस येऊ लागले आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी पत्रे घरांवर कोसळण्याची भीती स्थानिकांना सतावत आहे.तुटलेल्या पत्र्यांमुळे वाऱ्याच्या झोक्याने सतत आवाज होत असल्याने स्थानिकांच्या झोपताना ही त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
त्यामुळे हा प्रकल्प किमान नागरी वस्तीपासून दूर हलवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.दरम्यान, घनकचरा प्रकल्पाचा प्रश्न मी स्वतः हाताळत असून, लवकरच या प्रकल्पामध्ये सकारात्मक बदल दिसून येतील, असा दावा आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.
नियमांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष?
मिरा-भाईंदर महापालिकेने घनकचरा प्रकल्प नागरी वस्तीपासून केवळ सात मीटर अंतरावर उभारला आहे. मात्र, घनकचरा व्यवस्थापन नियमावली २०१६ नुसार, असा प्रकल्प वस्तीपासून किमान २०० मीटर अंतरावर असणे आवश्यक आहे. प्रशासनाने स्थानिक रहिवाशांचा विरोध डावलून हा प्रकल्प उभारला असून, त्यातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. काही नागरिकांनी आपली घरे सोडून अन्यत्र स्थलांतर केल्याची माहिती समोर आली आहे.