वसई :  मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबईतून राडारोड्याने भरलेली वाहने वसई विरारच्या भागात आणून टाकली जात आहेत. हा राडारोडा वेशीवरच रोखण्यासाठी आता महामार्गावर पथके नियुक्त करून कारवाई सुरू केली आहे. वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. मुंबई गुजरातसह इतर शहरांना जोडणारा हा महत्वाचा मार्ग आहे. आधीच हा महामार्ग विविध समस्यांनी ग्रासला आहे. त्यातच मागील दोन ते तीन वर्षांपासून महामार्गावर राडारोडा आणून टाकण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. विशेषतः मुंबई यासह अन्य ठिकाणी इमारतींचा पुनर्विकास व अन्य  विकास कामे  झपाट्याने सुरू आहेत. 

त्यामुळे खोदकाम, जुनी बांधकामे तोडणे त्यामुळे मोठ्या प्रमाणात राडा रोडा बाहेर निघत आहे. या राडारोड्याची विल्हेवाट लावण्याऐवजी थेट मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वसई विरार शहराच्या हद्दीत आणून टाकला जात आहे.  रात्रीच्या सुमारास छुप्या मार्गाने मुंबई व अन्य भागातील राडारोड्याने भरलेली वाहने महामार्गालगत खाली केली जात आहेत. वर्सोवा पुलापासून ससूनवघर, मालजीपाडा, चिंचोटी, नायगाव, सातीवली फाटा, पेल्हार, विरार अशा विविध ठिकाणी हा राडा रोडा टाकून दिला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेले राडारोड्याचे प्रमाण यामुळे महामार्गावर पूरस्थिती व वाहतूक कोंडीच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. अशा वाहनांना शहराच्या वेशीवर रोखण्यात यावे अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत होती.

या राडारोड्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी पालकमंत्री गणेश नाईक यांनी सुद्धा अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. याशिवाय जिल्हाधिकारी यांनी ही महसूल अधिकारी, पोलीस प्रशासन, महामार्ग प्राधिकरण, महापालिका यांनी संयुक्त कारवाई करावी असे सांगितले होते. अखेर शहराच्या वेशीवरच घोडबंदर वर्सोवा पूल येथे पथके नियुक्त करून राडारोड्याने भरलेल्या वाहनांना अडवून माघारी पाठविले जात आहे. पोलीस, तलाठी,प्राधिकरण, महापालिका यांचे संयुक्त पथक नेमून ही कारवाई सुरू असल्याचे वसईचे तहसीलदार डॉ.अविनाश कोष्टी यांनी सांगितले आहे.

मुंबईच्या भागातून राडारोडा वसईच्या भागात येत असल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या. तो राडारोडा रोखण्यासाठी आता पथके नेमून कारवाई सुरू आहे. वर्सोवा पूल, ससुनवघर या भागात ही पथके सक्रिय ठेवली आहेत. डॉ अविनाश कोष्टी, तहसीलदार वसई.