भाईंदर : स्टेम प्राधिकरण विभागाकडून मीरा-भाईंदर शहराला करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठय़ात ठाण्यामधील पातलीपाडा येथे अनधिकृत जलवाहिनी जोडण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यामुळे मीरा-भाईंदर शहराचे पाणी ठाणे महानगरपालिका अवैधरित्या घेत असून त्यावर तात्काळ कारवाई करणार असल्याचे स्टेम प्राधिकरणाच्या संचालकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मीरा-भाईंदर शहराला स्वतंत्र पाणी स्रोत नसल्यामुळे स्टेम प्राधिकरण आणि एमआयडीसी विभागाकडून मिळणाऱ्या पाणीपुरवठय़ावर शहराला अवलंबून राहावे लागत आहे. यात स्टेम प्राधिकरणकडून मीरा-भाईंदरला ८६ दशलक्ष लिटर तर एमआयडीसी विभागाकडून १३५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. यातील स्टेम प्राधिकरणाची निर्मिती २०२० रोजी ठाणे, मीरा-भाईंदर, भिवंडी अशा तीन महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा परिषद अशा चार संस्थांनी मिळून केली आहे. सद्यस्थितीत स्टेम प्राधिकरणात मीरा-भाईंदर महानगरपालिका ३३ टक्के मालक असून दररोज सुमारे ८६ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा शहराला होत आहे.

 मात्र गेल्या काही महिन्यांपासून या पाणीपुरवठय़ात कपात करण्यात येत असल्याने शहरात मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे ही टंचाई दूर करण्याकरिता शहरातील विविध पक्षांनी आंदोलन पुकारले. तर गुरुवारी ही टंचाई दूर करण्याकरिता प्राधिकरणाचे संचालक संकेत घरत यांनी पालिका मुख्यालयात हजेरी लावली. याप्रसंगी शहरातील पाणीपुरवठा कोणत्या आधारे कमी केला असा प्रश्न शहराच्या महापौर ज्योस्त्ना हसनाळे यांनी त्यांना विचारला. मीरा-भाईंदर शहराला स्टेम प्राधिकरण विभागाकडून होणाऱ्या जलवाहिनीमध्ये ठाण्यातील पातलीपाडा येथे पूर्वमाहिती न देता नियमांचे उल्लंघन करत जलवाहिनी जोडण्यात आल्याचे आरोप माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी केले. तर जलवाहिनीमुळे मीरा-भाईंदर शहराचे पाणी मोठय़ा प्रमाणात ठाण्यात जात असल्याचे उघडकीस आले. पातलीपाडा येथील जलवाहिनी पुन्हा लवकरच खंडित करणार असून मीरा-भाईंदरचा पाणीपुरवठा सुरळीत करणार असल्याची कबुली स्टेम प्राधिकरण विभागाचे संचालक संकेत घरत यांनी दिली. मीरा-भाईंदरला स्टेम प्राधिकरण आणि एमआयडीसी विभागाकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. यात वारंवार पाणीपुरवठा बंद करण्यात येत आहे. त्यामुळे मीरा-भाईंदर शहरावर मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाईचे संकट वारंवार उभे राहत आहे. अशा परिस्थितीत पालिकेची मालकी असलेल्या स्टेम प्राधिकरण विभागाने ८६ दशलक्ष लिटर पाणीपुरवठय़ासह कपात काळात अतिरिक्त ५० दशलक्ष पाणीपुरवठा उपलब्ध करावा अशी सूचना शिवसेनेच्या आ. गीता जैन यांनी संचालक संकेत घरत यांना दिली, तर ५० दशलक्ष लिटर पाणी नाही. मात्र कपात काळात अतिरिक्त २० ते २५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करू शकतो, असे घरत यांनी सांगितले.