विस्तारीकरणाचे काम रखडल्याने जुन्याच ठिकाणी रुग्णालय रुग्णसेवेत
पालघर : करोना संक्रमणाच्या काळात जिल्हा प्रशासनाने अधिग्रहीत केलेले बोईसर येथील टिमा रुग्णालयाचे नूतनीकरण व विस्तार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र विस्तारीकरण प्रकल्पाचे काम रेंगाळल्याने जुन्या ठिकाणीच ३० खाटांचे हे रुग्णालय येत्या आठवडाभरात बिगर करोना रुग्णांसाठी कार्यरत होणार आहे. त्यामुळे बोईसर व परिसरातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
बोईसर ग्रामीण रुग्णालयात दररोज सुमारे ३५० ते ४०० रुग्णांची तपासणी होत असताना भाड्याच्या जागेत कार्यरत असणाऱ्या रुग्णालयाची इमारत धोकादायक असल्याचे जाहीर झाले होते. हे रुग्णालय तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करण्यात आले होते. बोईसरमधील संजयनगर येथील शासकीय जागेत नवीन बोईसर ग्रामीण रुग्णालय उभारण्याचे निश्चिात करण्यात आले आहे. एका नामांकित पोलाद उद्योगाने सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून नवीन रुग्णालये उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
करोना संक्रमणाच्या काळात जिल्हा प्रशासनाकडे उपचार करण्याची व्यवस्था नसल्याने त्यावेळी बंद अवस्थेत असलेल्या टिमा रुग्णालयाला जिल्हा प्रशासनाने अधिग्रहित करून त्याचे ३० खाटांचे करोना रुग्णालयात रूपांतरित केले होते. पूर्वीप्रमाणेच या ग्रामीण रुग्णालयात दररोज रुग्ण तपासणी करून उपचार देण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान सप्टेंबरपर्यंत या रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर बाल उपचार विभाग व प्रसूती विभाग सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र रुग्णालय व्यवस्थापनातील घटकांमधील काही तांत्रिक अडचणींमुळे अजूनही पहिल्या मजल्यावरील रुग्णालय विस्ताराचे काम प्राथमिक अवस्थेत आहे. या नूतनीकरणासाठी सुमारे एक कोटीहून अधिक निधी खर्च होण्याची शक्यता असून आगामी दोन महिन्यात पहिल्या मजल्यावरील अद्यावत महिला व बाल उपचार केंद्र कार्यरत होईल यासाठी जिल्हा प्रशासन व टिमा प्रयत्नशील आहे. आठवड्याच्या अवधीमध्ये बोईसर ग्रामीण रुग्णालय कार्यरत होत असल्याने बोईसर व परिसरातील नागरिकांना औषधोपचार घेण्याची, गरज भासल्यास दाखल करण्यासाठी तसेच सर्वसाधारण प्रसूती करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. या रुग्णालयासाठी काही प्रमाणात कर्मचारी उपलब्ध असून अतिरिक्त लागणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी व पूर्ण वेळ स्त्री रोगतज्ज्ञ यांच्याकरिता जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात मागणी करण्यात येईल असे सांगण्यात आले.
रिवेरा करोना रुग्णालय बंद
जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील करोना रुग्ण संख्या मर्यादित राहिली असून रुग्णांना दाखल करण्याची क्वचितच गरज भासत आहे. या पार्श्वभूमीवर ३०० पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता असणारे विक्रमगड येथील रिवेरा करोना रुग्णालय बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आह. करोना रुग्णांना दाखल करण्याची व्यवस्था पालघर येथील अयोग्य पथकांच्या इमारतीमध्ये कार्यरत असणाऱ्या करोना उपचार केंद्रात आहेत.
काम अंतिम टप्प्यात
करोनाची दुसरी लाट संपल्यानंतर या ठिकाणी आणखी ५० ते ८० खाटांचा विस्तार करण्याच्या दृष्टीने तारापूर येथील काही औषध निर्मिती क्षेत्रात असणाऱ्या उद्योगांच्या मदतीने टिमा रुग्णालयाच्या विस्तार आणि नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सद्य:स्थितीत या रुग्णालयाच्या तळ मजल्यावरील रंगरंगोटी व नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून हे रुग्णालय बिगर कोविड रुग्णांसाठी तातडीने सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. तरी देखील रंगरंगोटी, साफसफाई तसेच औषध, उपकरणे व इतर सामग्री स्थलांतर करण्यासाठी किमान आठवडाभराचा अवधी लागेल असे सद्य:स्थितीत दिसून येत आहे.