कल्पेश भोईर, लोकसत्ता

वसईतील पाणजू बेट हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, सहा वर्षांचा कालावधी उलटून गेला तरीही पर्यटनाच्या दृष्टीने कोणत्याच हालचाली होत नसल्याने येथील पर्यटन विकासाला खीळ बसली आहे.

वसई नायगाव खाडी व भाईंदर खाडी यांच्या दोघांमध्ये पाणजू बेट परिसर आहे. बेटाच्या सभोवतालचा परिसर हा संपूर्ण समुद्राच्या पाण्याने वेढलेला असून हा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे.

या भागातील नागरिकांना रोजगाराच्या संधी याशिवाय वसई तालुक्याच्या पर्यटन क्षेत्राला चालना मिळावी यासाठी पर्यटनस्थळ नीती आयोगाने पहिल्या टप्यात देशातील १३८२ बेटांमधून २६ बेटांची निवड केली आहे. त्यात पाणजू बेटाचा समावेश केला होता. या बेटाचा विकास हा बेट समग्र विकास या अंतर्गत केला जाणार होता. २०१८ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्यासह केंद्र व राज्य शासनाचे विविध विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बेटावरील परिसराची पाहणी करून आढावा घेतला होता. त्यानंतर अहवाल तयार करून पुढील विकासात्मक कामाचे नियोजन केले जाणार होते.

हेही वाचा >>> वसई : नायगावच्या रेती बंदरात आढळला मानवी हाडांचा सापळा, कवटी आणि हाडे वेगवेगवेगळे

निधीची अडचण कायम

पाणजू बेटाचा पर्यटन विकास करण्यासाठी सुमारे ९० कोटींचा निधी लागणार आहे. परंतु इतका मोठा निधी जिल्हा स्तरावर उभा करणे कठीण असल्याने यासाठी केंद्र सरकारने यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी पालघर जिल्हा नियोजन विभागाकडून करण्यात आली होती. तर दुसरीकडे पर्यटन क्षेत्रात कांदळवन, वनविभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, सागरी किनारा नियमन तटरक्षक अशा विविध विभागाच्या परवानग्याही घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे सद्यास्थितीत निधी व परवानग्या याची अडचण कायम आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्राकडे प्रस्ताव

पाणजू बेटाचा पर्यटन विकास व्हावा यासाठी निधी याशिवाय विविध विभागाच्या परवानग्या लागणार आहेत. तसेच विकासाच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना व त्यात येत असलेल्या अडचणी याचा आढावा पालघर जिल्हा नियोजन विभागाकडून घेतला जात आहे. यासाठी केंद्राकडे प्रस्ताव ही पाठविण्यात आला आहे.परंतु अजूनही त्याला मंजुरी मिळाली नाही असे पालघर जिल्हा नियोजन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.