विरार : विरार पूर्वेच्या मनवेलपाडा परिसरात बेकायदा खासगी बस वाहनतळ समस्येमुळे या परिसरात वाहतूक कोंडीसह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मनवेल पाडा विवांता हॉटेलसमोरील रस्त्यावर सर्वत्र मोठ्या प्रमाणात खासगी बसेस, टँकर, चारचाकी गाड्या, खासगी प्रवासी कंपन्यांच्या बसगाड्या, बेवारस वाहने रस्त्याच्या कडेला उभी करण्यात येत असल्याने या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. याविरोधात कारवाई करून या बसेस कायमस्वरुपी हटविण्यात याव्यात अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे.

शहारत वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळ नसल्याने मुख्य रत्स्यांच्या कडेला, शाळांच्या परिसरात, उद्यानांच्या शेजारी अशा ठिकाणी अनेक खाजगी वाहने उभी केलेली दिसून येतात. विरार पूर्वेच्या डीमार्ट येथून नालासोपाऱ्याच्या प्रगतीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठया प्रमाणावर वाहतूक होत असते. मात्र सकाळी आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी या बेकायदा वाहनतळामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी निर्माण होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागतो असे इथल्या स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

अनेकदा बेवारस वाहनाचा वापर गर्दुल्ले, दारुडे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून केला जातो. यामुळे या परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो. तसेच मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या या वाहनतळामुळे या परिसरातुन रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे खासगी प्रवासी बस वाहनांना स्वतंत्र वाहनतळ उपलब्ध करून देण्यात यावे, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे. 

मोठ्या प्रमाणावर उभ्या असणाऱ्या या खाजगी बसची दुरुस्ती आणि स्वच्छता याच रस्त्यांवर केली जात असल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण होते. तसेच रात्रीच्या वेळी अंधारात ही वाहने लक्षात न आल्याने अपघात झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आक्रमक भूमिका घेत या वाहनतळावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरु केली होती मात्र काही महिन्यांनी ही कारवाई थंडावली.

आता पुन्हा या वाहनतळाचा प्रश्न निर्माण झाला असून यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याविरोधात कारवाई करून या बसेस कायमस्वरुपी हटविण्यात याव्यात अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे. बेकायदेशीर पणे उभ्या केल्या जाणाऱ्या बसेस व वाहनांवर सातत्याने कारवाई सुरू असते. पुन्हा एकदा मोहीम हाती घेऊन कारवाई तीव्र केली जाईल असे विरार वाहतूक शाखा  परिमंडळ २ चे वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक महेश शेट्ये यांनी सांगितले आहे.