वसई : वाहतूक धोरण निश्चित करून दीड ते दोन वर्षे उलटून गेल्यानंतर अखेर वसई विरार शहरात वाहतूक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली आहे. वाहतूक विभागाने निश्चित केलेल्या ठिकाणी पार्किंग व नोपार्किंग सूचना फलक लावणे व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत सहाशेहून अधिक ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक समस्या नियंत्रणात येईल असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
वसई विरार हे मुंबई जवळचे शहर असल्याने मागील काही वर्षांपासून येथील नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. या सोबतच वाहनांची संख्या ही बेसुमार वाढली आहे. या वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतूक नियोजन करणे कठीण होऊन बसले.वाहतूक कोंडी, वाहनतळ प्रश्न, अपुरे रस्ते अशा अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. या वाहतुकीचे नियोजन व्हावे यासाठी वसई विरार, मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाने स्थानिक महापालिकेच्या मदतीने शहराचे सर्वेक्षण करून ऑक्टोबर २०२३ मध्ये वाहतूक धोरण राबविण्याचा निर्णय घेतला होता.
यात वसई विरार शहरात २१५ ठिकाणी पार्किंग व नो पार्किंग, ५ ठिकाणी एकदिशा मार्ग, गर्दीच्या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी यांचा समावेश आहे.परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी सुरवातीला सूचना फलक, निर्देशक फलक लागणे आवश्यक होते. यासाठी वाहतूक विभागाने पत्रव्यवहार करून दिशा दर्शक फलक, मार्गदर्शक सूचना असे फलक लावण्यात यावे अशी मागणी पालिकेकडे केली होती. याबाबत सातत्याने स्मरण पत्र ही देण्यात आली होती. दीड ते दोन वर्षाचा कालावधी उलटून गेल्यानंतर अखेर वसई विरार महापालिकेने शहरातील रस्त्यावर दिशा दर्शक फलक, पार्किंग नो पार्किंग फलक बसविण्यास सुरुवात झाली असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. नऊ प्रभागात निश्चित केलेल्या ठिकाणांवर आतापर्यंत ६७१ इतके फलक बसविण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
आम्ही सांगितलेल्या बहुतांश भागात फलक लावण्यात आले आहेत. अन्य भागात ही फलक लावण्याचे काम सुरू असल्याचे वाहतूक पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी यांनी सांगितले आहे. त्यामुळे नो पार्किंग ठिकाणी वाहने उभी केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा ही देण्यात आला आहे.
नवीन सिग्नल यंत्रणेची गरज
वसई विरार मध्ये विविध ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली आहे. मात्र ती सुद्धा अपुरी आहे. विविध ठिकाणचे चौक व सर्कल अशा ठिकाणी सिग्नल यंत्रणा नसल्याने कोंडीची समस्या निर्माण होते. अशा ठिकाणी नव्याने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होणे आवश्यक आहे. यात छेडा नगर चौक नालासोपारा पश्चिम, गोकुळ टाऊनशिप जंक्शन विरार पश्चिम, साईबाबा नाका विरार पूर्व येथे सिग्नल यंत्रणा बसविण्यासाठी व साईनाथ नाका विरार, बोळींज नाका, संतोषभुवन चौक व कण्हेर फाटा येथील रस्त्यांचे काँक्रिटिकरण करण्यात यावे यासाठी वाहतूक विभागाने पत्रव्यवहार केला असल्याचे पोलीस निरीक्षक महेश शेट्ये यांनी सांगितले आहे.
अशा ठिकाणी एकदिशा मार्गिकेचे नियोजन
वसई मधील पारनाका ते वसई कोर्ट मार्ग आणि वसई-पश्चिम रेल्वे स्थानकापासून उपायुक्त कार्यालय पर्यंत जाणारा मार्ग एकदिशा मार्ग म्हणून घोषित करण्यात आला आहे.याशिवाय विरार मधील साईबाबा नाका ते वरद विनायक लेन कडून मजेठीया नाका रेल्वे स्टेशनकापर्यंत,उंबरगोठण नाका ते नवापूरमार्गांवरून राजोडी मार्गाने सत्पाळा नाकापर्यंत आणि विरार पश्चिम रेल्वे स्टेशन बाहेरील मार्ग एक दिशा मार्गिका म्हणून घोषित करण्यात आल्या असून हळूहळू त्याचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू अशी माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.
dवाहने टोइंगचा भुर्दंड कायम
वसई विरार शहरात वाहने उभी करण्यासाठी अजूनही हव्या त्या प्रमाणात अधिकृत जागा उपलब्ध नाहीत. त्यामुळे नागरिकांनी वाहने उभी तरी कुठे करायची असा प्रश्न वाहनचालकांनी केला आहे. त्यासाठी आधी जागा दाखवा मगच वाहने टोइंग करा असे नागरिकांमधून सांगितले जात आहे. वाहने उभी करताच वाहने टोइंग करून नेली जात आहेत. त्यामुळे वाहनचालकांना आर्थिक फटका बसतो. तर दुसरीकडे खासगी पार्किंग चालक मात्र त्यांची वाहने रस्त्यावरच पार्किंग करून ठेवत आहेत त्यांची वाहने का उचलली जात नाही असा ही प्रश्न उपस्थित होत आहे.