भाईंदर :- मिरा भाईंदर शहरातील मुख्य मार्गांवर उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलांवर आता वाहतूक कोंडीची समस्या उभी राहत आहे. यामुळे रहदारीच्या वेळेत प्रवाशांचा मोठा वेळ वाया जात आहे. शहरातील मुख्य मार्गांवरील वाहतूक सुरळीत पार पडावी व मेट्रोसोबत इतर वाहनांच्या प्रवासात सुसूत्रता यावी, यासाठी एमएमआरडीएमार्फत तीन उड्डाण पुलांची उभारणी करण्यात आली आहे. यापैकी दोन पूल वापरात असून, एका पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, नव्या पुलावरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनाच्या अभावामुळे आता उड्डाण पुलावर देखील वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
ही समस्या विशेषतः प्रेझेंट पार्क येथील उड्डाण पुलावर तीव्र स्वरूपात जाणवत आहे.हा पुल उतरल्यावर रस्ता निमुळता होतो. याठिकाणी वळण घेण्यासाठी तसेच रस्ता ओलांडण्यासाठी वेगळा मार्ग ठेवण्यात आलेला असला, तरी पोलीस कर्मचारी नसल्यामुळे वाहनचालक अनियमितपणे वाहने चालवत असल्याचे दिसून येतात. यामुळे रहदारीच्या वेळी वाहने वळवायला पुरेशी जागा उरत नाही आणि मोठी कोंडी निर्माण होते.
अनेक वेळा या कोंडीत प्रवाशांचा १५ ते २० मिनिटांपर्यंत वेळ वाया जातो. त्यामुळे ही समस्या मार्गी लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी तातडीने नियोजन करावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर, लवकरच संबंधित ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात केले जातील, अशी माहिती वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.