वसई: ठाणे घोडबंदर येथील गायमुख रस्ते दुरुस्तीचे कामाचा फटका आता प्रवाशांना बसू लागला आहे. महामार्गापाठोपाठ आता वसई विरार शहरातील अंतर्गत रस्ते ही कोंडीत सापडू लागले आहेत. नायगाव -बापाणे, टीवरी फाटा -भोयदापाडा रस्त्यावर कोंडी झाली आहे. विशेषतः ऐन सणासुदीच्या काळात ही कोंडी झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होऊ लागले आहेत.
घोडबंदर येथील गायमुख घाटात मोठं मोठे खड्डे तयार झाले होते. या खड्ड्यामुळे सातत्याने घोडबंदर पासून ते मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होत होती. या वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी प्रशासने ८ ते ११ ऑगस्ट दरम्यान रस्ते दुरुस्तीचे काम घेतले आहे. त्यामुळे हा मार्ग बंद करून येथील वाहतूक चिंचोटी भिवंडी मार्गावर वळविली आहे. परंतु वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे महामार्गावर ही प्रचंड कोंडी होत आहे.
तर दुसरीकडे महामार्गावर कोंडी असल्याने अनेक वाहन चालक वसई विरार अंतर्गत रस्त्यावरून ये जा करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे ते रस्ते ही आता कोंडीत सापडू लागले आहेत.विरार फाटा ते चिंचोटी अशी कोंडी असल्याने अनेक वाहनचालक मुंबईला जाण्यासाठी अंतर्गत रस्त्यावरुन नायगाव- बापाणे मार्गे जात आहेत. त्यामुळे शुक्रवार पासूनच टीवरी भोयदापाडा रस्ता व नायगाव जूचंद्र- बापाणे रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या उदभवू लागली आहे. शनिवारी ही समस्या कायम होती. तासनतास या कोंडीत अडकून राहावे लागत असल्याचे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहे. तर गाव पाड्यातील दैनंदिन जनजीवन ही विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून येत आहे. वाहतूक पोलीस ही कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र सुरू असलेल्या विकास कामामुळे रस्ते अरुंद झाल्याने ते सुद्धा हतबल झाले आहेत.
‘लाडक्या बहिणींना’ कोंडीचा फटका
रक्षाबंधन म्हणजे बहीण भावांच्या अतूट बंधाला अधिकच दृढ बनवणारा सण. या सणाच्या निमित्ताने अनेक बहिणी या भावांना राखी बांधण्यासाठी जातात. मात्र वाहतूक कोंडी, वाहतूक व्यवस्थेचा अभाव यामुळे अनेक लाडक्या बहिणींना आपल्या भावाचे घर गाठताना अडचणी आल्या असल्याचे महिलांनी सांगितले. तर काहींनी कोंडीमुळे जाणेच रद्द केले आहे. नियोजन शून्य कारभारामुळे आज अशी स्थिती निर्माण होते अशी प्रतिक्रिया महिलांनी दिल्या आहे.
इंधन अभावी प्रवासी वाहतूक सेवा ठप्प
महामार्ग व अंतर्गत रस्त्यावर कोंडी असल्याने त्याचा परिणाम हा दैनंदिन प्रवासी वाहतूक सेवेवर झाला आहे. अनेक रिक्षा या सीएनजीवर चालणाऱ्या आहेत. परंतु वाहतूक कोंडी असल्याने सीएनजी भरण्यासाठी जात येत नाही याशिवाय महामार्गावर ही येता येत नाही त्यामुळे अनेक रिक्षा चालकांच्या रिक्षा बंद आहेत. तर दुसरीकडे पालिकेची परिवहन सेवा सुरू असली तरी ती बस सुद्धा कोंडीत अडकून राहिल्याने कामानिमित्त बाहेर पडलेल्या प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत. रिक्षांसाठी प्रवाशांनी रांगा लावल्याचे चित्र पहायला मिळाले.