महामार्गावरील वाहनचालकांसह प्रवाशांना दिलासा

वसई : भाईंदर खाडीवरील जुन्या वर्साेवा पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून सोमवारी रात्री १२ नंतर हा पूल अवजड वाहतुकीसाठी खुला केला आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक सुरळीत झाली असून महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा मुंबई व गुजरातसह इतर विविध विभागांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर असलेल्या जुन्या वर्साेवा पुलाची दुरुस्ती करण्याचे काम १३ ते १५ नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये हाती घेण्यात आले होते. या पुलावर महामार्ग प्राधिकरण व आयआरबी यांच्यामार्फत हे काम पूर्ण करण्यात आले आहे. या काळात जुन्या पुलावरून अवजड वाहनांना बंदी घालून त्यांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. परंतु इतर हलक्या वाहनांची संख्या अधिक प्रमाणात असल्याने  वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. यात प्रवाशांना तासन्तास खोळंबून राहावे लागत होते. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू होती.

 सोमवारी रात्रीपर्यंत या पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करून रात्री १२ नंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सेवा सुरळीत झाल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

वाहतूक पोलिसांनाही दिलासा

वर्साेवा पुलावरून गेलेला महामार्ग हा मुंबई, ठाणे, पालघर, वसई, यासह विविध भागांना जोडणारा एकमेव मार्ग आहे. या मार्गावरील दुरुस्तीच्या कामामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. ही समस्या सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांना नियोजन करावे लागते. पुलाचे दुरुस्तीचे काम आज होईल की उद्या होईल अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे  वाहतूक पोलिसांनाही दोन ते तीन वेळा अधिसूचना काढाव्या लागल्या होत्या. अखेर नोव्हेंबर महिन्याच्या १३ ते १५ तारखेचा मुहूर्त मिळाल्याने पूल दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. या दरम्यान होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले होते. मात्र वाहनांची संख्या अधिक प्रमाणात असल्याने वाहतूक पोलिसांना दिवसरात्र वाहतूक कोंडी नियंत्रणासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अखेर या पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने वाहतूक कोंडीही नियंत्रणात आल्याने पोलिसांना दिलासा मिळाला आहे.