वसई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वसईच्या ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांनी पिकविलेल्या गावठीभाज्या व रानभाज्या विक्रीवर भर दिला आहे. गणेशोत्सव निमित्ताने दोन पैसे अधिकचे पदरी पडत असल्याने वसईच्या विविध ठिकाणी दारोदारी फिरून या फळभाज्यांची विक्री करीत असल्याचे चित्र दिसून आले आहे.
वसईच्या पूर्वेतील ग्रामीण भागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गावठीभाज्या, रानभाज्या यांची लागवड केली जाते. सणासुदीचा काळ सुरू होताच या भाज्या चांगल्या तयार होतात. भाज्यामध्ये कारले, शीरघोसला, टाकला, अंबाडीची पाने, कंटोळ, गवती चहा, दोडकी, डांगर, आलूची पाने, भाजा, दुधी, काकडी, भेंडी, टरबूज, कोवाली, दिंडे, कोवळ्या, देठ या भाज्यांचा समावेश आहे. विशेषत: गणेशोत्सव काळात या फळ-भाज्यांना अधिक मागणी असते. यातूनच या बांधवांना थोड्या फार प्रमाणात उत्पन्न मिळते. यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. आता सणासुदीचा काळ सुरू झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आदिवासी महिलांची गावठी फळभाज्या व रानभाज्या विक्रीची लगबग सुरू झाली आहे. रस्त्याच्या कडेला बसून व दारोदारी फिरून याची विक्री केली जाऊ लागली आहे. या भाज्या कोणत्याही प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया करून न वाढविता या भाज्या नैसर्गिक खतांचा वापर करून वाढविल्या जात असल्यामुळे आरोग्यासाठी या फळभाज्या उपयुक्त ठरतात. यामुळे ग्राहकही या भाज्यांना अधिक पसंती देत आहे.