विरार : वसई-विरार परिसरात करोना काळात वाहतूक पोलिसांनी हजारो वाहनांवर कारवाई केली. ही सर्व कारवाई ऑनलाइन पद्धतीने केली असल्याने बहुतांश नागरिकांनी दंड भरलेच नाही. यामुळे करोना काळात जवळपास अडीच कोटीची थकबाकी झाली आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी वाहतूक शाखेने दंड न भरणाऱ्या वाहनाची जप्ती करण्याचे ठरविले आहे.
करोना संसर्ग वाढू नये यासाठी शहरात टाळेबंदी जाहीर केली होती. यावेळी शासनाने वेगवेगळे निबंध लादले होते. त्यानुसार पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. पण यावेळी वाहन चालकांची कागदपत्रे तपासणी त्यांच्याकडून रोख दंड वसूल करणे यासाठी मनाई करण्यात आली होती यामुळे पोलिसांनी अनेक कारवाई करत ऑनलाईन चलानद्वारे कारवाई करून वाहने सोडून दिली होती. याचा फायदा घेत बहुतांश कारवाई केलेल्या वाहन धारकांनी हे दंड भरले नाहीत.
विरार वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी माहिती दिली की, वसई आणि विरार दोन्ही शाखा मिळून जवळपास दोन कोटी ५० लाख रुपयाची दंड वसुली बाकी आहे. करोना काळात पोलिसांनी विना मुखपट्टी, विना हेलमेट, एकाच गाडीवर तिेघे (ट्रिपल सीट), क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी (ओवर सीट), साइड मिरर, विना परवाना आणि शासनाच्या करोना काळातील लागू केलेल्या निर्बंधांनुसार कारवाई केली आहे. पण अजूनही मोठ्या प्रमाणात दंड वसुली असल्याने पोलिसांनी आता हे वसुली सुरु केली आहे. कारवाई झालेल्या व्हान धारकांना आवाहन आहे की, त्यांनी तत्काळ आपले दंड भरावे अन्यथा त्यांचे परवाने, तसेच वाहनांची कागदपत्रे, व वाहन जप्तीची कारवाई केली जाणार आहे. यासाठी २ अधिकारी आणि १० पोलीस कर्मचारी यांचा समूह तयार करण्यात आला आहे. तसेच शहरातील प्रमुख ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी सुरु केली आहे. यात वाहनांना अडवून त्याची तपसणी केली जात आहे. ज्यांच्यावर दंड आहे अशा वाहनांना तत्काळ दंड भरण्याचे सांगितले जात आहे. यामुळे नागरिकांनी दंड भरून पोलिसांना सहकार्य करावे असे सुपे यांनी सांगितले.