वसई: नायगाव पूर्वेच्या ससूपाडा येथील एका काच कारखान्यात दहा हजार किलो काचेची थप्पी अंगावर पडून दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. यात एका सतरा वर्षीय बाल कामगाराचा समावेश आहे. कशिश यादव (१७), अक्रम अख्तर अली खान (२७)अशी या मृतांची नावे आहे. याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात कारखाना मालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नायगाव पूर्वेच्या ससूपाडा येथे राडाजी प्रा. लिमिटेड संभाजी इंडस्ट्री मध्ये काच कारखाना आहे.अक्रम आणि कशिश हे दोघेही त्या ठिकाणी कामगार म्हणून काम करतात. मंगळवारी सायंकाळी येथील मालकांनी त्यांना काचेची दहा हजार किलोची थप्पी वाहून नेण्याचे काम सांगितले होते. हे काम करत असतानाच अचानकपणे काचेची थप्पी त्यांच्या अंगावर कोसळली त्यामुळे दोघेही त्या काचेखाली चेपले व त्यातील काचा फुटून त्यांच्या अंगात घुसल्या. त्यामुळे दोघेही रक्तबंबाळ झाले होते. तातडीने त्यांना नायगाव येथील निळकंठ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र दोघेही गंभीर जखमी झाल्याने रात्री साडेबाराच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
कारखाना मालकाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असल्याने मेहुल जैन (२६), रोहित जैन (२६) या कारखाना मालकांच्या विरोधात विरोधात नायगाव पोलीस ठाण्यात बी.एन.एस कलम १०६,३ (५), अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण कायदा) २०१५ कलम ७५,७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. लवकरच त्यांना अटक केली जाईल असेही पोलिसांनी सांगितले आहे.
कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
काच कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नसल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः यात मृत्यू झालेला एक कामगार हा सतरा वर्षांचा होता. मग बाल कामगार कसा काय काम करू शकतो असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.