वसई : वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच मालमत्ता धारकांसाठी एक दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे. ‘अभय योजना २०२५-२६’ अंतर्गत महापालिकेने मालमत्ता कर थकबाकीवर आकारण्यात येणाऱ्या दंडावर ५० टक्क्यांची सवलत जाहीर केली आहे.

वसई विरार महापालिका हद्दीत १० लाख ८ हजार २२ एवढ्या मालमत्ता आहेत. त्यात छोट्या मोठ्या औद्योगिक वसाहती, उपहारगृहे, इमारती, सदनिका आदींचा समावेश आहे. या मालमत्ताधारकांकडून आकारण्यात आलेला कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. यामुळे मालमत्ता कर संकलनासाठी पालिकेकडून विविध योजना राबविल्या जातात. तसेच वेळेत किंवा वेळेआधी कर भरणाऱ्या नागरिकांना ३ टक्के, ५ टक्के सवलत दिली जाते.

पण, तरीही अनेक मालमत्ताधारक कर भरणा करण्यासाठी पुढे येत नसल्याने कराची रक्कम थकीत राहते. थकीत मालमत्ता धारकांना दंड आकारण्यात येतो. असा दंड व थकीत मालमत्ता कराची रक्कम वसूल करण्यासाठी अभय योजना सुरू केली आहे. २० ऑगस्ट २०२५ पासून ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत मालमत्ता कर भरल्यास मालमत्ता कर थकबाकीवर आकारण्यात येणाऱ्या दंडावर ५० टक्क्यांची सवलत देण्यात येईल. ही योजना वसई-विरार महानगरपालिका हद्दीतील सर्व निवासी, वाणिज्य, औद्योगिक व मोबाईल मनोऱ्यांच्या मालकांसाठी लागू असणार आहे.

या योजनेचा लाभ घेणाऱ्या करदात्यांनी प्रलंबित अपील अथवा दावे विना अट मागे घ्यावे लागणार आहेत. तसेच, दिलेला धनादेश वटला नाही तर सवलत रद्द होईल. योजना ज्या कालावधीत लागू आहे, त्या कालावधीबाहेरील भरण्यांवर कोणतीही सवलत मिळणार नाही, असे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि थकबाकी त्वरित भरावी, असे आवाहन मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त दीपक झिंजाड यांनी केले आहे.