लोकसत्ता प्रतिनिधी
वसई: भारतीय हवामान खात्याने वसईसहित पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी भागाला दिलेला अवकाळी पावसाचा इशारा खरा ठरला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावत वसईतील शेतकरी व व्यावसायिकांना तडाखा दिला आहे.
हवामानात होत असलेल्या वातावरणीय बदलांमुळे मागील चार ते पाच वर्षांपासून सलग अवकाळी पावसाचा फटका बसू लागला आहे.रविवारी पुन्हा एकदा अवकाळी पावसाने वसई विरारमध्ये हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर अधिक असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी वाहत होते.या पावसामुळे रस्त्यावर झोपड्याबांधून असलेल्या मजुरांची ची सामान आवरा आवर करण्यासाठी चांगलीच धावपळ झाली होती.
आणखी वाचा-वसईतील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा सीरियल रेपिस्ट गजाआड
तर दुसरीकडे भातशेतीच्या कापणीची कामे अंतिम टप्प्यात असतानाच पाऊस कोसळत असल्याने मोठ्या प्रमाणात भात शेतीचे नुकसान झाले आहे. कापणी केलेले भात, भात पिकांची भारे बांधून ठेवलेली उडवी सुद्धा पूर्णतः भिजली आहेत. तर काही भागात रब्बी हंगामासाठी पेरण्या केल्या होत्या त्यासुद्धा वाया गेल्या असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. समुद्र किनाऱ्यापट्टीच्या भागात मच्छिमार बांधवांनी बोंबील, करंदि, मांदेली, वागटी, जवळा या सुकविण्यासाठी ठेवलेल्या मासळीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याशिवाय मीठ उत्पादक, वीटभट्टी व्यावसायिक , फळबागा, यासह इतर हंगामी व्यवसाय यांचे नुकसान झाले आहे. अशा प्रकारच्या होत असलेल्या वातावरण बदलाचा परिणाम हा नागरी आरोग्यावर ही होऊ लागला आहे.
आणखी वाचा-वसई विरार महापालिकेतील २७ आयुर्वेदीक डॉक्टर झाले कायम
लग्नसराईवर पावसाचे सावट
दिवाळीनंतर तुळशी विवाह संपन्न झाल्यानंतर लग्न सोहळ्याचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. वसई विरार यासह इतर भागात ही लग्नसमारंभ आहेत. मात्र ऐनवेळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने त्याचा फटका या लग्नसमारंभाला बसला असून वधू वर व पाहुणे मंडळी यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.