वसई : महामार्गा पाठोपाठ आता अंतर्गत रस्त्यांच्या कडेला राडारोडा आणून टाकण्याचे प्रकार घडू लागले आहे. शिरसाड – वज्रेश्वरी रोडवरील मांडवी येथे रस्त्यावर राडारोडा आणून टाकणारे दोन ट्रक चालक आणि इतर तीन जणांविरोधात मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राडारोडा वाहून आणणारा ट्रक रस्त्याच्याकडेला अडकून पडल्यामुळे सदर प्रकार उघडकीस आला.
वसई विरार मध्ये महामार्ग यासह विविध ठिकाणच्या भागात राडा रोडा आणून टाकण्याचे प्रकार घडत आहेत. काही वेळा हा राडारोडा अगदी रस्त्याच्या मध्येच आणून टाकला जात असल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होत असतो. सुरुवातीला महामार्गावर मोठ्या प्रमाणात राडा रोडा टाकला जात होता. आता शहराच्या व गावा अंतर्गत राडारोडा व इतर कचरा आणून टाकण्याचे प्रकार घडू लागले आहेत.
विरार पूर्वेच्या शिरसाड – वज्रेश्वरी रस्त्यावरील मांडवी भागातही मोठ्या प्रमाणावर रोडरोडा टाकण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फार्महाउस, रिसॉर्ट यामुळे तसेच हा रस्ता पुढे महामार्गाला जोडला जात असल्यामुळे या रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी असते. पण, रस्त्याच्याकडेला असणारा अवैध राडारोडा मुसळधार पावसामुळे अनेकदा रस्त्यावर वाहून येतो. त्यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसत असल्याचे वाहनचालकांनी सांगितले आहे.
राडारोडा टाकताना रंगेहाथ
मांडवी येथील रामरहीम फार्महाऊसजवळ डेब्रिज टाकताना एक हायवा ट्रक रस्त्याच्या कडेला अडकला. त्यामुळे ट्रक चालक हा रंगेहात पकडला गेला. ट्रक मध्येच अडकून राहिल्याने मुख्य रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. याप्रकरणी मांडवी पोलिसांनी महेंद्र यादव (३८), अन्सार शेख (३४), गोविंद सिंग (३२) व अन्य दोन जण अशा ५ जणांवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२५, ३२६ (ब), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करून बीएनएस ३५(३) नुसार नोटीस देण्यात आली आहे. २ हायवा ट्रकही जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.